Join us

कॉफी पिणं जरा अती होतंय, हे सांगणारी ३ लक्षणं! फार कॉफी पिणं आरोग्याला बरं नाही कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 16:35 IST

Drinking too much coffee: रिफ्रेश होण्यासाठी दिवसातून काही वेळा कॉफी पिणं ठीक.. पण त्याचा अतिरेक होत आहे, हे सांगणारी काही लक्षणं वेळीच ओळखणं गरजेचं आहे...

ठळक मुद्दे आपलं शरीर त्याबाबत सूचना देतं, पण आपल्याला हे कशाचं लक्षण आहे, तेच नेमकं समजत नसतं..

काम करून करून कंटाळा आला की हमखास कॉफी प्यावी वाटते.. काम करताना झोप अनावर होत असेल तरी झोपेला पळवून लावण्यासाठीही कॉफी आठवते.. ऑफिसमध्ये आहात आणि कलिगसोबत काहीतरी गॉसिप करायचंय तरी कॉफीची आठवण येते.. अशी कोणत्याही बहाण्याने कधीही कॉफी पिणारे अनेक लोक आहेत.. पण कॉफीचा असा अतिरेक (coffee intake) आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. आपलं शरीर त्याबाबत सूचना देतं, पण आपल्याला हे कशाचं लक्षण आहे, तेच नेमकं समजत नसतं..

 

याविषयी करण्यात आलेल्या काही संशोधनानुसार असं सांगण्यात आलं आहे की दिवसभरातून तुम्ही ४ कप (4 cup coffee) पेक्षा अधिक कॉफी पिऊ नये. आठवड्याला २८ कप कॉफी पुरेशी आहे. यापेक्षा जर अधिक कॉफी तुम्ही घेत असाल तर नक्कीच याचे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात. दिवसभरातून ४ कप कॉफी हे प्रमाण योग्य मानलं गेलं असलं तरी तुमच्या कपाचा आकार केवढा आहे आणि तुम्ही किती स्ट्राँग कॉफी पिता, त्यात किती साखर घालात, हे काही मुद्देही लक्षात घेणं गरजेचं असतं. 

 

तुम्ही खूप जास्त कॉफी घेताय, हे सांगणारी काही लक्षणे १. एन्झायटी आणि नैराश्य सामान्यपणे असं मानलं जातं की एक कप कॉफीतून आपल्या शरीरात ९५ मिलीग्रॅम कॅफेन मिळतं. जर तुम्ही दिवसातून ४ कप कॉफी घेत असाल तर तुमच्या शरीरात जवळपास ५०० मिलिग्रॅम कॅफेन जातं. Journal of Psychopharmacology reports यांच्या सर्व्हेक्षणानुसार एवढ्या जास्त प्रमाणात कॅफेन शरीरात जात असेल तर त्यामुळे अनेक मानसिक त्रास निर्माण होऊ शकतात. लहान- सहान गोष्टींचा खूप जास्त ताण येणे, एन्झायटी, नैराश्य अशा मानसिक समस्या जाणवायला लागल्या असतील तर एकदा तुमचं कॉफी पिण्याचं प्रमाण तपासून पहा.

 

२. झोपेवर परिणाम मेंदूला चालना देणं, मन आणि शरीर रिफ्रेश करणं हे कॉफीमधल्या कॅफेनचे शरीरावर होणारे काही सकारात्मक परिणाम. पण कॉफीचा अतिरेक झाला तर मात्र तुमची रात्रीची झोप डिस्टर्ब होऊ शकते. त्यामुळे तुम्ही सकाळी आणि दिवसभर कॉफी प्या. पण सायंकाळनंतर मात्र कॉफी पिणे टाळा, असा सल्ला दिला जातो.

 

३. हार्टबीट वाढणे... रक्तदाबाचा त्रास सुरू झाला, तर साधारणपणे हे लक्षण जाणवते. पण कॅफेनचा खूप जास्त मारा शरीरात होत राहिला, तरी देखील हृदयाची धडधड वाढणे, बीपी वाढल्यासारखे वाटणे, अचानकच छातीत धडधड  होणे, अशी लक्षणं जाणवू लागतात. तुम्हालाही अशी लक्षणं जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला तर घ्याच पण कॉफीचं सेवनही तपासून पहा.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समानसिक आरोग्यहृदयरोग