IVF ही ट्रिटमेंट गर्भधारणेसाठी नक्कीच उपयुक्त आहे. अनेक उदाहरणे आपण आजूबाजूला पाहत असतो. मात्र फक्त एकाच बाजूने विचार न करता सगळ्या बाजूंनी विचार करुन मगच पुढील वाटचाल ठरवावी. असे डॉक्टर अंजली देवल स्त्रीरोगतज्ज्ञ आणि फर्टीलीटी स्पेशालिस्ट यांनी लोकमत सखीशी संवाद साधताना सांगितले. (What if IVF fails? first talk to Experts, before IVF figure out these important things )अपयशाची भीती मनातून कशी काढावी आणि IVF करण्याआधी कोणत्या चाचण्या कराव्या याची माहिती त्यांनी सांगितली.
IVF करण्याआधी काही चाचण्या करणे फार गरजेचे असते. फक्त महिलाच नाही तर पुरुषांचीही चाचणी केली जाते. सगळ्यात आधी महिलांची रक्त तपासणी केली जाते. रक्त चाचणी करताना हार्मोनल तपासणी केली जाते. तसेच नॉन हार्मोनल तपासणीही रक्त तपासणीचाच भाग आहे. सोनोग्राफी करणे उपयुक्त ठरते. वजन तपासावे लागते. महिलांचे वजन आणि गर्भधारणा यांचा थेट संबंध असतो. पुरुषांची शुक्राणू चाचणी केली जाते. ती फार महत्त्वाची असते. काही इन्फेक्शन आहे का याची तपासणी करावी लागते. IVF करतानाच नाही तर गर्धणारणेचा विचार करताना शुगर, थायरॉईड, हिमोग्लोबिन तपासणे गरजेचे असतेच. ते सारे तपासले जाते. मात्र फक्त शारीरक नाही तर मानसिक तपासणीही करणे गरजेचे आहे. जोडप्याशी संवाद साधून त्यांना समुपदेशन करणे फार गरजेचे असते. कोणत्याही IVF सारख्या ट्रिटमेंटमधून जाण्याआधी मानसिकता तपासावी लागते.
एखादं जोडपं IVF ट्रिटमेंट घेतं आणि ती अयशस्वी ठरते. त्याचा परिणाम शरीरावर मनावर होतोच. मात्र जर असे अपयश आले असेल तर जोडप्यांनी त्यातून बाहेर कसे यावे आणि पुन्हा IVF करावी का? हा प्रश्न अनेकांना भेडसावतो. डॉ. म्हणतात, IVF फेल झाली तर सगळ्यात आधी आम्ही जोडप्याशी संवाद साधतो. त्याचे काऊंसिलींग करतो. काही जण पुन्हा ट्रिटमेंट घ्यायला शरीराने आणि मनानेही तयार असतात मात्र सगळ्यांनाच ते जमते असे नाही. आठ ते नऊ वेळा ट्रिटमेंट फेल झाल्यानंतर गर्भधारणा झाली अशीही उदाहरणे आहेत. एका वेळेनंतर आपल्या हातात काही नसते. सगळ्या गोष्टींचा समतोल माणूस राखू शकत नाही. त्यामुळे ट्रिटमेंट घेण्याआधीच मानसिकता तयार करणे गरजेचे असते.
डॉक्टरांनी एक फार छान मुद्दा मांडला. त्या म्हणतात, जोडप्याने आशावादी नक्कीच असावं. मात्र प्रॅक्टीकल असणंही तेवढंच गरजेचं आहे. IVF चा सक्सेस रेट शंभर टक्के नाही हे जाणून घेणे आणि त्यानुसार तयार होणे महत्त्वाचे असते. जर अपयश आलेच तर मग त्याचा मानसिक त्रास होणं स्वाभाविक आहे. त्यातून बाहेर लवकर येता यावं यासाठी प्रॅक्टीकल राहणं उपयुक्त ठरतं. तसेच डॉक्टरांशी संवाद साधा. नक्की काय झालं अपयश का आलं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. म्हणजे त्यावरुन पुढील निर्णय घेता येतात.