हिवाळा म्हणजे ऋतूचक्रातील सर्वात आल्हाददायक काळ असतो, प्रसन्न हवा आणि आरोग्यदायी वातावरणामुळे या काळात आपली शरीरबांधणी अतिशय वेगाने होत असते. शरीरातील नवीन पेशींची उत्पत्ती जोरात होते. शरीरातील दुरुस्ती तसेच देखभालीचे काम चांगल्या पद्धतीने होण्यास हिवाळा ऋतू अतिशय चांगला मानला जातो. त्यामुळे येणाऱ्या ऋतूंमध्ये तंदुरुस्त राहायचे असेल तर शरीराचे भरण-पोषण करणाऱ्या अन्नघटकांनी परीपूर्ण पदार्थांना या काळात प्राधान्य द्यायला हवे. प्रतिकारशक्ती वाढवण्याच्यादृष्टीनेही हा काळ अतिशय चांगला मानला जातो. हिवाळ्यात भूक वाढते, शरीराचे इंजिन उत्तमरितीने कार्यरत होते. तसेच हिवाळ्यात अन्नपचन सुधारते. म्हणूनच हिवाळ्यात पोषण देणारे पदार्थ आहारात अधिक प्रमाणात असायला हवेत. आहारतज्ज्ञ सुकेशा सातवळेकर याबाबत काही नेमक्या गोष्टी सांगतात. थंडीच्या काळात कॅलरीज जास्त घेतल्या असे चालते असे आपण म्हणत असलो तरी किती जास्त याबाबत स्पष्टता असायला हवी. तर केवळ ५ ते १० टक्के कॅलरीजच नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात आहारात घ्यायला हव्यात. आता जास्त कॅलरीज किंवा ऊर्जा देणारे पदार्थ कोणते, ते किती आणि कसे खायला हवेत याबाबत...
१. बाजरी, मका, सोयाबिन, राजगिरा, शिंगाडा यांचा वापर थंडीच्या दिवसांत आहारात नियमीतपणे करायला हवा. यातून शरीराला उष्णता आणि प्रोटीन्स मिळण्यास मदत होते.
२. थंडीच्या काळात बाजारात कंदमुळे जास्त प्रमाणात उपलब्ध असतात. सुरण, रताळी, बटाटा यांतून शरीराला व्हिटॅमिन्स मिळण्यास मदत होते. भाज्यांमध्ये सोयाबिन, पावटा, मसूर, चवळी यातूनही प्रोटीन्स मिळत असल्याने या काळात आवर्जून खायला हवेत.
३. याशिवाय खजूर, सुके अंजीर, जर्दाळू, काळ्या मनुका, खारीक, बेदाणे या सुकामेव्यामुळे शरीराला व्हिटॅमिन्स आणि खनिजे मिळण्यास मदत होते. बदाम, आक्रोड, काजू, पिस्ता यांतून शरीराला उपयुक्त घटक मिळत असले तरी त्यात अधिक कॅलरीज असल्याने ते प्रमाणात खायला हवे.
४. थंडीच्या दिवसांत हाडांची दुखणी वाढतात, अंगदुखी, सांधेदुखी अशा वेदना वाढतात. शरीराला असणारी खनिजांची गरज भरुन काढणे या काळात आवश्यक असते. अशावेळी अहळीव आणि डिंक खाल्ल्यास त्याचा शरीराला चांगला फायदा होतो. मेथीच्या दाण्यांना मोड आणून ते खाल्ल्यास हाडांचे आणि सांध्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
५. याबरोबरच थंडीच्या काळात सर्दी, कफ, खोकला, ताप यांसारख्या समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. सध्या तर कोरोनामुळे या समस्यांचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी आलं, सुंठ, तुळस, गवती चहा, लसूण हे औषधी गुणधर्म असलेले पदार्थ आहारात आवर्जून घ्यायला हवेत.
६. या काळात साखरेऐवजी गूळाचा वापर केल्यास उत्तम. गुळाचा शिरा, मध यांचा वापर केल्यास शरीराला उष्णता आणि खनिजे जास्त प्रमाणात मिळतात.
७. शरीरबांधणीसाठी प्रोटीन्स आवश्यक असतात, त्यामुळे शरीर चांगले ठेवण्यासाठी पांढरे आणि काळे तीळ थंडीच्या दिवसांत आहारात आवर्जून असायला हवेत. शेंगदाणे, जवस, कारळे यांच्या चटण्याही आवर्जून आहारात असायला हव्यात.
८. मधल्या वेळात खाण्यासाठी सोया नट्स किंवा सालासकट फुटाणे, मखाणे खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. कच्ची किंवा उकडलेली मोड आलेली कडधान्ये खाणे या काळात सर्वोत्तम.
९. हळद, मिरे, लवंग, मोहरी हे पदार्थ जंतूनाशक आहेत. शरीराचा दाह नाहीसे करणारे घटक असल्याने आहारात या पदार्थांचा थंडीच्या दिवसांत आवर्जून समावेश करायला हवा.
१०. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते. तसेच श्वसनमार्गाचा जंतूसंसर्ग कमी होण्यास आवळा अतिशय उपयुक्त ठरतो. त्यामुळे या काळात आवळा आवर्जून खायला हवा. फुफ्फुसांच्या पेशींचे काम चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आवळा चांगला.