Join us   

अंगावरून पांढरं खूप जातं, हे तब्येतीला चांगलं की घाबरण्यासारखं? डॉक्टर सांगतात की....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 2:08 PM

White discharge causes preventions : किशोरवयीन आणि तरुण मुलींपासून ते ज्यांची मासिक पाळी बंद झाली आहे अशा महिलांपर्यंत कोणालाही हा त्रास होऊ शकतो.

ल्युकोरिया (Leucorrhoea) किंवा अंगावरून पांढरे पाणी जाणे (White discharge) ही महिलांमध्ये बऱ्याच प्रमाणात आढळून येणारी एक समस्या आहे.  स्त्रीरोगतज्ञांकडे सल्ला घेण्यासाठी येणाऱ्या २५% केसेस याच समस्येशी संबंधित असतात.  बहुतांश वेळा ल्युकोरिया फिजिऑलॉजिकल म्हणजे शरीरातील सर्वसामान्य क्रियांचा एक भाग असू शकतो म्हणजे त्यामुळे आरोग्याला विशेष धोका नसतो पण काही वेळा ही समस्या पॅथॉलॉजिकल किंवा आरोग्याला हानिकारक असू शकते.  पॅथॉलॉजिकल कारणांमुळे अंगावरून पांढरे पाणी जात असेल तर त्याचे कारण संसर्ग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असू शकतो. (White discharge causes preventions)

किशोरवयीन आणि तरुण मुलींपासून ते ज्यांची मासिक पाळी बंद झाली आहे अशा महिलांपर्यंत कोणालाही हा त्रास होऊ शकतो. सर्वसामान्य ल्युकोरिया काय असतो. याबाबत डॉ. वैशाली जोशी, (कन्सल्टन्ट, ऑब्स्टेट्रीशियन  आणि गायनॅकॉलॉजिस्ट, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल)  यांनी अधिक माहिती दिली आहे. (white discharge reasons, causes)

सामान्य किंवा निरोगी ल्युकोरिया काय असतो? (What is Leucorrhoea (Likoria) )

ल्युकोरिया सामान्य आहे अथवा नाही हे पाण्याच्या रंगावरून, पाणी सतत जात आहे अथवा नाही हे तपासून आणि त्यांच्या वासावरून ठरवले जाते.  शरीरातील नियमित क्रियांचा एक भाग म्हणून जर पाणी जात असेल तर त्याचा रंग पांढरा असतो आणि त्यामध्ये हलकी पिवळट छटा असू शकते किंवा नसते देखील, ते पाण्याइतके पातळ किंवा काहीसे बुळबुळीत असू शकते.  त्याला वास येत नाही.

दोन मासिक पाळींच्या मधला कालावधी (ओव्यूलेशन - जेव्हा बीजकोष फुटून स्त्री जनन पेशी बाहेर येतात तो काळ), मासिक पाळी सुरु होण्याच्या आधीचा काळ, शरीर संबंधांच्या वेळी उत्तेजना सर्वात जास्त असताना, ताणतणाव असतील तर, यौवन काळात आणि गरोदर असताना अशाप्रकारे अंगावरून पांढरे पाणी जाते.  

अंगावरून पांढरे पाणी जाणे निरोगी का असते?

गर्भाशयाचे मुख, योनी सारख्या खालच्या जननेंद्रियाच्या अवयवांमध्ये एक ग्रंथी असते जी लैंगिक हार्मोन्सच्या प्रभावाखाली स्रवते. हे स्त्राव आणि योनीमध्ये असलेल्या मृत पेशी आणि जिवाणू मिळून निरोगी किंवा फिजिऑलॉजिकल ल्युकोरिया तयार होतो. ही शरीराची नैसर्गिक साफसफाई यंत्रणा आहे, शरीरातील नैसर्गिक छिद्रांचे संसर्गापासून संरक्षण करणे, संभोगाच्या वेळी ल्युब्रिकेशन प्रदान करणे आणि प्रजनन प्रक्रियेत मदत करणे हे यामागचे उद्देश असतात.  

काठापदरच्या देखण्या साडीवर जुन्या स्टाइलचे काकूबाई ब्लाउज घालताय? हे घ्या एकापेक्षा एक Wow पॅटर्न

स्त्रीरोगतज्ञाकडे कधी जावे?

अंगावरून पांढरे पाणी जाण्याचे प्रमाण खूपच जास्त असेल, इतके जास्त की त्यामुळे अंतःवस्त्र पूर्णपणे ओले होऊन जात असेल किंवा लघवी करतेवेळी त्रास होत असेल तर स्त्रीरोगतज्ञाकडे जावे.  या स्रावाला दुर्गंधी येत असेल, तो दह्याइतका घट्ट असेल, त्याचा रंग हिरवट किंवा पिवळट असेल, त्यामुळे खाज येत असेल, ओटीपोटात वेदना होत असतील, संभोगाच्या वेळी खूप जास्त दुखत असेल किंवा संभोगानंतर रक्ताचे डाग दिसत असतील तर हा पॅथॉलॉजिकल ल्युकेरिया आहे आणि त्याचे निदान व त्यावर उपचार केले जाणे गरजेचे आहे. 

पॅथॉलॉजिकल ल्युकोरियाची कारणे कोणती असतात?

याची सर्वात मुख्य आणि सामान्य कारणे म्हणजे योनीमार्गामध्ये होणारे कॅंडिडिआसिस (थ्रश नावाचा बुरशीजन्य संसर्ग), बॅक्टेरियल व्हजायनोसिस सारखे जिवाणू संसर्ग. कॉपर टी, हार्मोनल गर्भनिरोधक गोळ्या, टॅम्पॉन्ससारख्या वस्तूंचा शरीराच्या आत वापर, अलीकडच्या काळात वाढलेला प्रतिजैविकांचा (अँटिबायोटिक्स) वापर, लैंगिक संबंधांतून पसरणारे संसर्ग किंवा क्वचितच काही केसेसमध्ये गर्भाशयाचा कर्करोग यासारख्या कारणांमुळे योनीतून स्त्राव होऊ शकतो.

 रोज सकाळी फक्त १ केळी खा; शरीराला मिळतील 'हे' जबरदस्त फायदे; चांगल्या तब्येतीचा सोपा फंडा

योनिमार्गाची आणि त्याच्या आजूबाजूच्या भागाची स्वच्छता नीट ठेवली न गेल्यास किंवा योनीमध्ये शॉवरसारख्या साधनाचा वापर करण्याची (dooshing) सवय यामुळे योनीमधील निरोगी जीवाणू समाप्त होतात. ज्यामुळे संसर्गजन्य जीवाणूंची वाढ होऊ शकते.  मधुमेह, स्टिरॉइड्सचा दीर्घकाळ वापर, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे आणि गर्भावस्था यामुळे हार्मोन्समध्ये होणाऱ्या चढ-उतारांमुळे महिलांना या आजाराचा सामना करावा लागतो.

ल्युकोरियाशी संबंधित गैरसमज कोणकोणते आहेत?

१. पाठदुखीचे कारण ल्युकोरिया आहे - या दोन्ही गोष्टींचा काहीही थेट संबंध नाही. अंगावरून पांढरे पाणी जाण्याबरोबरीनेच जर सर्विसायटिस म्हणजे गर्भाशय ग्रीवाला सूज आलेली असल्यास अधूनमधून पाठदुखी होऊ शकते. पण पाठदुखीचे नेमके कारण याची तपासणी स्वतंत्रपणे केली गेली पाहिजे. 

२. हे शरीराच्या सामान्य कमकुवतपणाचे लक्षण आहे आणि यामुळे शरीरातून ऊर्जा बाहेर टाकली जाते. - योनीतून निरोगी स्त्राव हे हार्मोनल समतोल चांगला असल्याचे चिन्ह आहे. कधीकधी त्याचा संबंध पोषणातील कमतरता आणि अशक्तपणाशी असू शकतो.

 हिवाळ्याच्या दिवसात वाढतो हार्ट अटॅकचा धोका; जीवघेण्या अटॅकपासून बचावाचे उपाय, कारणं जाणून घ्या

या समस्येवर औषधांशिवाय उपचार होऊ शकतात का?

सामान्यतः निरोगी ल्युकोरियासाठी कोणत्याही उपचारांची आवश्यकता नसते. ही समस्या नसून शारीरिक क्रियांचा एक भाग आहे ही समज जर महिलेला असेल तर बऱ्याच महिलांच्या बाबतीत हा प्रश्न आपोआपच मिटतो. अंतःवस्त्रे सुती व सैल असावीत, लघवी आणि शौच करून झाल्यावर शरीराचे खाजगी भाग समोरून ते मागील दिशेने नीट धुवून स्वच्छ करणे, योनीतून डुशिंग करणे किंवा औषधी किंवा सुगंधी टब बाथचा वापर करणे टाळणे यासारख्या साध्या उपायांमुळे फरक पडू शकतो.

आहारामध्ये बदल घडवून आणणे देखील फायदेशीर ठरू शकते. मसालेदार, तेलकट तळलेले अन्न टाळणे, जास्त प्रमाणात कृत्रिम शर्करायुक्त मिठाई इत्यादी टाळणे आणि नैसर्गिक दही, फायबरचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ, प्रो-बायोटिक यांचा नेहमीच्या आहारात समावेश केल्याने योनीमध्ये निरोगी जिवाणूंच्या वाढीस मदत मिळते आणि पुन्हा-पुन्हा संसर्ग होणे टाळले जाऊ शकते. काही पारंपरिक उपाय करून, जसे की, धणे किंवा मेथी पाण्यामध्ये भिजवून ठेवून ते पाणी प्यायल्याने देखील आराम मिळू शकतो. 

सारांश असा की, ल्युकोरिया ही काही जीवघेणी समस्या नाही, पण म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. त्याचे नेमके कारण काय याचे निदान करण्यासाठी आणि आवश्यकता असल्यास, त्वरित उपचार सुरू करण्यासाठी स्त्रीरोगतज्ञांशी सल्लामसलत करून समस्या लवकरात लवकर दूर करणे आवश्यक आहे. स्वत: ठरवलेले, मित्र, कुटुंबीय आणि केमिस्ट यांनी सांगितलेले उपचार अनावश्यक किंवा चुकीचे असू शकतात आणि त्यामुळे एखादी साधीशी बाब देखील खूप गंभीर आजार बनू शकते.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यमहिलास्त्रियांचे आरोग्य