Join us   

Toxic shock syndrome : सावधान! महिलांमध्ये वाढतोय जीवघेण्या टॉक्सिक शॉक सिंड्रोमचा धोका; जाणून घ्या लक्षणं अन् उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 7:21 PM

Toxic shock syndrome : डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्त आणि लघवीची तपासणी करून या आजाराबाबत माहिती मिळवता येऊ शकते.

(Image Credit - clevelandclinic.org)

टॉक्सिक शॉक सिंड्रोम हा आजार महिलांच्या शरीरासाठी धोकादायक ठरत आहे. स्टॅफिलोकोकस ऑरियस या बॅक्टेरियांची वाढ जास्त प्रमाणात झाल्यामुळे हा आजार वाढत जातो. महिलांच्या शरीरात हा बॅक्टेरिया दिसून येतो.  साधारणपणे पिरिएड्सदरम्यान हा आजार महिलांमध्ये उद्भवतो. खासकरून ज्या महिला टॅम्पोनचा वापर करतात त्यांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. 

या आजारात ब्लड प्रेशर वेगाने कमी होते. शरीरात ऑक्सिजन योग्यरित्या पोहोचत नाही ज्यामुळे महिलांना मृत्यूचाही सामना करावा लागू शकतो. अमेरिकेतील रहिवासी असलेली २४ वर्षीय मॉडेल लॉरेन वासेरला २०१२मध्ये हा आजार झाला होता. लॉरेनच्या शरीरात विषारी पदार्थ जास्त झाल्यामुळे तिला आपला पायही उचलता येत नव्हता. शेवटी या  तरूणीला आपला एक पाय कापावा लागला. 

टॉक्सिक शॉक सिंड्रोम  मेन्स्ट्रअल स्पॉन्ज, डायफ्राम आणि सर्वायकल कॅपशी निगडीत आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर लगेचच महिलांना टॉक्सिक शॉक येण्याची भिती असते. पुरूष आणि महिला दोन्हींना या समस्येचा सामना करावा लागू शकतो. सर्जरी, जखम, कृत्रिम उपकरणांच्या वापरादरम्यान स्टॅफ बॅक्टेरियांच्या संपर्कात व्यक्ती येऊ शकतो.  टॉक्सिक शॉक सिंड्रोमची एक तृतीयांश प्रकरणं ही  १९ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलींमध्ये दिसून येतात. ३० टक्के महिलांना हा आजार एकापेक्षा जास्त वेळा होतो. या आजारामुळे फुफ्फुसं आणि हृदयही काम करत नाही. म्हणून सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा.

लक्षणं

अचानक ताप येणं

रक्तदाब कमी होणं

डायरिया

हाताच्या तळव्यांवर रॅशेज येणं

मासपेशींत वेदना

डोकेदुखी

जर तुम्ही मासिक पाळीदरम्यान टेम्पॉन वापरत असाल आणि या दरम्यान तुम्हाला ताप, किंवा उलटी येत असेल तर त्वरीत डॉक्टरांची मदत घ्यायला हवी. 

कारणं

स्टॅफिलोकोकस ऑरियस बॅक्टीरिया शरीरात विशिष्ट प्रकारचे विष तयार करते.  त्यामुळे टॉक्सिक शॉक सिंड्रोमचा आजार होतो. या बॅक्टेरियामुळे अनेक रुग्णांमध्ये स्किन इन्फेक्शन होऊन त्यांची  सर्जरी करावी लागते. सुरूवातीला स्टॅफ हा बॅक्टेरिया महिलांच्या योनीत असतो त्यावेळी कोणत्याही प्रकारचं नुकसान  पोहोचवत नाही. टॅम्पोनमुळे या बॅक्टेरियाला शरीरात पसरण्यास वाव मिळतो. त्यानंतर हा बॅक्टेरिया विषारी पदार्थ बनवणं सुरू करतो. जे हळूहळू रक्तात मिसळतात. सुती किंवा रेयान फायबर्सच्या तुलनेत पॉलिएस्टर फोमपासून तयार झालेले टॅम्पोन बॅक्टेरियांच्या वाढीस प्राधान्य देतात. 

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्त आणि लघवीची तपासणी करून या आजाराबाबत माहिती मिळवता येऊ शकते. वजायना, सर्विक्स किंवा घश्याचा स्वॅब घेतला जातो.  या बॅक्टेरियाचा शरीराचा वेगवेगळ्या अवयवांवर किती परिणाम झाला आहे हे पाहण्यासाठी सीटी स्कॅन किंवा चेस्ट एक्स रे काढावा लागू शकतो. 

उपचार

हा आजार झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एंटी बायोटिक घेऊन उपचार करता येऊ शकतात. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी औषध दिले जाऊ शकतात. हा आजार कोणत्या स्टेजमध्ये आहे यावर उपचार अवलंबून असतात. म्हणून सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करणं गरजेचं आहे. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यमहिला