बाळ हवं असं म्हणून आसूसलेल्या जोडप्यांना जेव्हा आयव्हीएफचा सल्ला दिला जातो तेव्हा अनेकदा निर्णय घेणं सोपं नसतंच. मनात काही समज-गैरसमज असतात. आर्थिक प्रश्नही असतात तसे आपल्याला होऊ शकणाऱ्या शारीरिक त्रासाविषयीही काही प्रश्न, काही गैसमज असतात. अनेकांच्या मनात आयव्हीएफविषयी भीतीही दिसते. मनात बऱ्याच शंका असतात त्या शंका, गैरसमज दूर होणे गरजेचे आहे.
मुख्य गैरसमज काय दिसतात?
१. आयव्हीएफ : पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होते.
आयव्हीएफ केलं तरी अपत्यप्राप्ती कधी होणार हे इतरही अनेक गोष्टींवर अवलंबून असते. जसे की वय, अंडाशय, स्पर्म काऊंट, नवरा- बायको या दोघांच्याही प्रकृती, त्यांना असणारे आजार.. त्यामुळे आयव्हीएफचा सक्सेस रेट चांगला असला तरी पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असे नाही. अनेक जणांना एकापेक्षा जास्त वेळाही या प्रक्रिया कराव्या लागतात. तुमचे शरीर त्या सगळ्या उपचारांना कसा प्रतिसाद देते त्यावरही आयव्हीएफचे यश अवलंबून असते.
२. आयव्हीएफ केल्यानंतर जुळे किंवा तिळेच होतात
हा एक गैरसमज अनेकांच्या मनात आहे. त्यामुळे कित्येक जण आयव्हीएफ करायला थोडे घाबरतात. पण आता आयव्हीएफमध्येही जे काही अत्याधुनिक उपचार आले आहेत, त्यानुसार एकापेक्षा जास्त गर्भ राहणार नाही याची काळजी घेतली जाते. यालाच elective single embryo transfer (eSET) असं म्हणतात. त्यामुळे आता आधीच्या तुलनेत जुळे किंवा तिळे होण्याची शक्यता बरीच कमी झालेली आहे.
३. वय वाढल्यानंतरच आयव्हीएफ करणं धोक्याचं..
बाळ होण्यासाठी आधी इतर सगळे प्रयत्न करावेत. त्यानंतर जर कोणत्याच उपचारातून यश आलं नाही तर आयव्हीएफचा विचार करावा. तसेच वय जास्त असणाऱ्या महिलांसाठीच आयव्हीएफचा पर्याय चांगला आहे, असे अनेक गैरसमज अनेकांच्या मनात आहेत. पण असं नाही. तरुण महिलाही लवकर आयव्हीएफ उपचार घेऊन अपत्यप्राप्तीचं सुख घेऊ शकतात. आणि वय वाढलेलं असलं तरीही करु शकतात.
४. आयव्हीएफ द्वारे जन्माला येणारी बाळं अशक्त असतात.
हा एक मोठा गैरसमज आहे. आयव्हीएफद्वारे जन्माला येणारी बाळं ही नॅचरली कन्सिव्ह होणाऱ्या बाळांएवढेच निरोगी आणि सुदृढ असतात.
५. वंध्यत्व निवारणासाठी आयव्हीएफ हा एकच उपाय आहे.
वंध्यत्व निवारणासाठी जे काही इतर उपाय आहेत, त्यापैकीच एक उपाय म्हणजे आयव्हीएफ. आयव्हीएफ करण्यासाठी रुग्णाची तपासणी केली जाते. त्यांच्या आरोग्याचा, लाईफस्टाईलचा बारकाईने अभ्यास केला जातो आणि शक्य असल्यास intrauterine insemination (IUI) ट्रिटमेंट सुचविली जाते. ती जर शक्य नसेल तरच आयव्हीएफचा सल्ला दिला जाताे.