अशक्तपणा ही अनेकांची नेहमीची तक्रार असते. नीट खात पित असलो, पुरेश झोप होत असली तरी काही जणांना सतत एकप्रकारचा अशक्तपणा जाणवत राहतो. महिलांमध्ये प्रामुख्याने ही तक्रार सातत्याने जाणवते. घरातली कामं, ऑफीसची कामं, प्रवास या सगळ्या धावपळीमुळे महिलांना बरेचदा थकवा येतो. कित्येकदा घाईत महिला नुसता चहा घेऊन घरातून निघतात आणि नंतर गडबडीत खायचेही विसरतात. शिळे खाणे, आहारातून योग्य पद्धतीने पोषण न होणे ही महिलांच्या थकव्यामागची मुख्य कारणे असतात. तरुण वयात याचा फारसा त्रास जाणवत नाही. मात्र वय वाढते तसे शरीर एक एक संकेत द्यायला सुरुवात करते आणि मग काही ना काही तक्रारी सुरू होतात (Easy home Remedy to Overcome Deficiencies).
शरीरात रक्ताची, व्हिटॅमिन्स, लोह आणि हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर सतत थकवा येणे, आराम करावासा वाटणे, अंग दुखणे अशा तक्रारी वारंवार सुरू होतात. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले तर हे दुखणे कालांतराने वाढते आणि मग प्रतिकारशक्ती कमी होत जाते आणि इतर तक्रारी सुरू होतात. असे होऊ नये यासाठी आहार उत्तम घेणे हा सर्वात सोपा उपाय असतो. प्रथिने, सुकामेवा, फळं, भाज्या, तृणधान्ये, कडधान्ये, डाळी आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करणे अतिशय महत्त्वाचे असते. यासाठी आज आपण एक अतिशय सोपा उपाय पाहणार आहोत. केवळ २ पदार्थांपासून १ काढा तयार करुन प्यायल्यास शरीराला त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. पाहूयात हा काढा कसा तयार करायचा.
काढा करण्याची पद्धत -
२०० मिलीलीटर पाण्यात २ चमचे गूळ घालून हे पाणी चांगले उकळून घ्या. थंड झाल्यावर या पाण्यात लिंबू पिळा. मग हा काढा एक एक घोट करुन प्या. सकाळी झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटी हा काढा प्यायल्यास त्याचा जास्त चांगला फायदा होतो. हा काढा प्यायल्यानंतर साधारण अर्धा तास काहीच खाऊ नयेत. वय वर्ष ८ च्या पुढील कोणीही हा काढा पिऊ शकते. ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी मात्र या काढ्यात लिंबू पिळू नये.
फायदे -
१. हातापायाला येणाऱ्या मुंग्या कमी होण्यास याची चांगली मदत होते.
२. तोंड आले असेल तर तोंडातील जखमा बऱ्या होण्यास याची चांगली मदत होईल.
३. घशाची खवखव कमी होण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.
४. गुळामुळे शरीरातील लोहाची मात्रा सुधारण्यास मदत होते
५. गुळातील अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्मामुळे संसर्ग आणि अॅलर्जीपासून दूर राहण्यास मदत होते.
६. लिंबामुळे सी व्हिटॅमिन मिळते आणि प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.