Join us   

टीनएज प्रेग्नन्सी : ऐन विशीत 'असा' टाळा गरोदरपणाचा धोका !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 7:20 PM

Women Health & Safety : ऐन विशीत असुरक्षित शरीर संबंधातून  गरोदरपण वाट्याला आलेच  तर  घ्यायची  काळजी! 

(Image Credit- Verywellfamily)

एखादी मुलगी जर वय वर्षे २० च्या आधी गर्भार राहिली तर त्याला टीनएज प्रेग्नन्सी म्हटलं जातं. टीनएज प्रेगनन्सी बाळ आणि आई दोघांच्या दृष्टीने योग्य नसते. त्याचप्रमाणे टिनेजमध्ये लैंगिक संबंध ठेवणंही योग्य नाही. पण जर टिनेजमध्ये प्रेगनन्सी राहिलीच तर टीनएजर आईवर आणि बळावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेतलं पाहिजे. 

टीनएज प्रेग्नन्सीचे परिणाम 

टीनएजर प्रेगनन्सीमध्ये उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. मूत्रपिंडावर ताण येऊन काहीवेळा परिस्थिती जीवघेणी बनू शकते. उच्च रक्तदाबाबरोबरच मधुमेह आणि इतर दीर्घकालीन आजार मागे लागण्याचीही शक्यता असते. 

लहान वयात बाळंतपण झालं तर बाळ वेळेआधीच (प्रीमॅचुअर) जन्माला येणं किंवा कुपोषित बाळाचा जन्म होणंही शक्य असतं. याचा परिणाम म्हणजे बाळाच्या शरीराची/ अवयवांची अपुरी वाढ होणं. ३७ आठवड्यांआधी जर बाळाचा जन्म झाला तर अपूर्ण वाढ झालेलं बाळ जन्माला येण्याची शक्यता दाट असते.  यातल्या काही समस्या जन्मानंतरही तयार होऊ शकतात आणि आयुष्यभर टिकून राहू शकतात.

आयुष्यभरासाठी आजार बाळाच्या मागे लागू शकतात. मेंदू आणि हृदयावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. श्वास घ्यायला, स्तनपान करायला त्रास होणं, कॉग्नेटिव्ह म्हणजे आकलनाशी निगडित कौशल्ये विकसित न होणं अशाही समस्या उद्भवू शकतात. बाळंतपणात बाळ दगावण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. 

टीनएज प्रेगनन्सीत मुलींना काहीवेळा मानसिक ताणतणावांना सामोरं जावं लागू शकतं. कुटुंबीय आणि मित्रपरिवारासमोर जायची लाज वाटू शकते. ज्यामधून नैराश्य येऊ शकतं आणि या सगळ्याचा बाळाच्या वाढीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. 

टीनएज प्रेगनन्सीत काय आणि कशी काळजी घेतली पाहिजे?

एखादी मुलगी तिच्या टिनेजमध्ये प्रेग्नन्ट राहिली तर सगळ्यात पहिली आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे तिला योग्य ते वैद्यकीय उपचार मिळायला हवेत. स्त्रीरोगतज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. या काळात कशी काळजी घ्यायची, काय खायचं, काय टाळायचं या गोष्टी स्त्री रोगतज्ज्ञ व्यवस्थित समजावून देऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागलं पाहिजे म्हणजे मग प्रेगनन्सी आणि गरोदरपण आणि  बाळंतपण  दोन्ही सुखकर होवू  शकतं.  

खालील पैकी कुठलीही लक्षणं दिसली तर ताबडतोप डॉक्टरशी संपर्क करून उपचार घेतले पाहिजेत. 

१) योनीमार्गातून रक्तस्त्राव 

२) योनीमार्गातून द्रव स्त्राव 

३) सतत उलट्या होणं 

४) ओटी पोटात दुखणं 

५) अंधुक दिसणं 

६) तीव्र डोकेदुखी 

७) थंडी ताप 

८) शुच्या जागेपाशी जळजळ किंवा वेदना 

९) पायांवर सूज 

टीनएज प्रेगनन्सी टाळता येऊ शकते. ती टाळण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे लहान वयात शारीरिक संबंध टाळले पाहिजेत. याशिवाय लैंगिक शिक्षण आणि बर्थ कंट्रोल वापरूनही प्रेग्नन्सी टाळता येऊ शकते. त्यातूनही जर टिनेजमध्ये प्रेग्नन्सी राहिलीच तर ताबडतोब  डॉक्टरांकडे जाऊन योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे.   

तज्ञ मार्गदर्शक : डॉ. सुप्रिया अरवारी (एमडी डिजिओ)

टॅग्स : महिलामहिला आणि बालविकासहेल्थ टिप्सआरोग्य