lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Adolescence > आपण नेमके जाड की बारीक, हे कसं ठरवणार? हे वाचा आणि मग ठरवा आपण लठ्ठ की बारकुडे?

आपण नेमके जाड की बारीक, हे कसं ठरवणार? हे वाचा आणि मग ठरवा आपण लठ्ठ की बारकुडे?

कोण काय म्हणतं, वजन वाढलं की घटलं, आपण दिसतो कसे यापेक्षा वजनाचा विचार शास्त्रीय पध्दतीने समजून घेण्याची गरज आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:30 PM2021-03-31T16:30:53+5:302021-03-31T16:33:52+5:30

कोण काय म्हणतं, वजन वाढलं की घटलं, आपण दिसतो कसे यापेक्षा वजनाचा विचार शास्त्रीय पध्दतीने समजून घेण्याची गरज आहे.

watch your BMI, weight & check if you are fat or Fit? | आपण नेमके जाड की बारीक, हे कसं ठरवणार? हे वाचा आणि मग ठरवा आपण लठ्ठ की बारकुडे?

आपण नेमके जाड की बारीक, हे कसं ठरवणार? हे वाचा आणि मग ठरवा आपण लठ्ठ की बारकुडे?

Highlightsबारीक माणसाने आयुष्यभर बारिकच राहावे व जाड माणसाने आयुष्यभर बारीक होण्याचा प्रयत्न करावा. 

डॉ. यशपाल गोगटे 

लहानपणापासून शरीराचा विकास व वाढ होत असतांना वयात येताना, मोठं होताना उंची व वजन वाढणे हा नैसर्गिक नियम आहे. पण एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे ज्यावेळेस वजन वाढते त्यावेळेस ते नुकसानकारक ठरत असते. या वरून जाडी किंवा लठ्ठपणा ठरत असतो. पण आपण जाड आहोत का नाही हे कसे ओळखावे? व्यक्ती तितक्या प्रकृती प्रमाणेच प्रत्येकाची अंगकाठी व वजन वेगवेगळे असते. त्यामुळे लठ्ठपणा ठरवतांना केवळ वजनाचा निकष लक्षात न घेता आणखीन काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते. 


यासाठी BMI हा साधारण लोकांना सहजपणे मोजता येईल  असा फॉर्मुला उपयोगात आला. 
BMI = वजन (Kg) / उंचीचा वर्ग (m2).
उदाहरणादाखल: 5 फूट 7 इंच  (1.7 मीटर )उंचीच्या व 75 किलो वजनाच्या माणसाचा BMI = 75/ (1.7)2 = 25.9
आशिया खंडातील विशेषतः भारतीयांमध्ये BMI २१ हा योग्य मानला जातो. परंतु तो अधिक असल्यास त्या व्यक्तीला स्थूल असे म्हंटले जाते. हाच मानक युरोपीय लोकांसाठी ३० असा आहे. याचे कारण भारतीय लोकांमध्ये चरबी मुख्यतः पोटाच्या आसपास अधिक प्रमाणात साठते. पोटाच्या आसपासची चरबी ही जास्त धोकादायक असते कारण ही चरबी शांत न बसता रक्तामध्ये काही टॉक्सिक हार्मोन्स सोडते ज्याला ऍडीपो- सायटोकाईन्स असे म्हणतात. हे ऍडीपो- सायटोकाईन्स स्थूलते मुळे होणाऱ्या मानसिक व शारीरिक आजारांना आमंत्रण देतात. या उलट युरोपीय वंशातील लोकांमध्ये  खांदा व मानेच्या अवती- भवती विसावलेली चरबी ही शांत व निष्क्रिय असल्यामुळे एकूणच कमी धोकादायक असते.
BMI च्या व्यतिरिक्त पोटाचा घेर सुद्धा लठ्ठपणाचा एक चांगला मापदंड म्हंटला जातो. स्त्रियांमध्ये हा ≥31 in (80 cm) व पुरुषांमध्ये हा ≥35 in (90 cm) च्या वर असल्यास स्थूलतेत मोडतो.
वजनाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम हे दोन प्रकारात मोडतात- एक चयापचयाशी संबंधित आजार जसे डायबेटीस, कोलेस्टेरॉल, उच्च- रक्तदाब इ. व दुसऱ्या प्रकारातील आजार स्थूलतेमुळे हाडं व स्नायूंचे आजार- पाठदुखी पासून गुडघे दुखी पर्यंत. या दोन्ही धोक्यांमध्ये तुलना केल्यास चयापचयाशी संबंधित आजार हे थोडेही वजन वाढले तरी आपले डोके वर काढतात, तर हाडांच्या व स्नायूंचे आजार वजनातील लक्षणीय वाढी नंतरच होतात.  आपल्या शरीराचे वजन वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे येऊ शकते. त्यामध्ये अक्षरशः किलो-दीड किलोचाही फरक पडू शकतो. त्यामुळे शक्यतो वजन मॉनिटर करतांना एकाच वेळी ऐकाच काट्यावर वजन करावे.
१८-२० वयानंतर आपली उंची स्थिरावते व हाडांची वाढ थांबते. त्यामुळे या वयात जे वजन असते ते आपल्या शरिराला सहजपणे पेलवते. सामान्यतः एक समज आहे कि वयाबरोबर वाढणारे वजन हे शरीराला सहजपणे पेलवता येते. पण या वाढणाऱ्या वजनालाही ५ किलो पर्यंतची मर्यादा असते. म्हणजेच तुमच्या १८-२० वर्षाच्या वजनापेक्षा जर तुमचे वजन ५ किलो पेक्षा अधिक असेल, आणि जरीही ते उंचीला प्रमाणशीर असेल तरीही ही लठ्ठपणाची सुरवात ठरू शकते. उदाहरणादाखल एखाद्या अतिशय काटक स्त्रीचे १८-२०व्या वर्षीचे वजन ४५ किलो  आहे व दहा वर्षानंतर ते ६० झाले, तर ती लठ्ठपणातच मोडते. तिच्या उंचीनुसार योग्य वाटणारे हे वजन हे तिच्या करता धोकादायक असू शकते. त्यामुळे बारीक माणसाने आयुष्यभर बारिकच राहावे व जाड माणसाने आयुष्यभर बारीक होण्याचा प्रयत्न करावा. 

(लेखक नाशिकस्थित एंडोक्रिनॉलॉजिस्ट हार्मोन तज्ज्ञ आहेत.)
dryashpal@findrightdoctor.com
 

Web Title: watch your BMI, weight & check if you are fat or Fit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.