lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Adolescence > मासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कप वापरायचं ठरवता आहात ? योग्य कप कसा निवडाल?

मासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कप वापरायचं ठरवता आहात ? योग्य कप कसा निवडाल?

मासिक पाळी दरम्यान मेन्स्ट्रुअल कप वापरणं हा एक सुरक्षित मार्ग असू शकतो. मेन्स्ट्रुअल कप सिलिकॉनपासून बनवलेले असतात आणि शरीरासाठी योग्य असतात. शिवाय मेन्स्ट्रुअल कप पर्यावरण पूरक असतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 02:37 PM2021-04-05T14:37:31+5:302021-04-05T15:25:38+5:30

मासिक पाळी दरम्यान मेन्स्ट्रुअल कप वापरणं हा एक सुरक्षित मार्ग असू शकतो. मेन्स्ट्रुअल कप सिलिकॉनपासून बनवलेले असतात आणि शरीरासाठी योग्य असतात. शिवाय मेन्स्ट्रुअल कप पर्यावरण पूरक असतात.

Using a menstrual cup during menstruation is a safe and convenient option ... how is it? | मासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कप वापरायचं ठरवता आहात ? योग्य कप कसा निवडाल?

मासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कप वापरायचं ठरवता आहात ? योग्य कप कसा निवडाल?

Highlightsमेन्स्ट्रुअल कप निवडण्यापूर्वी तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांशी बोलून घ्या. कारण कप्समध्ये वेगवेगळे आकार येतात.कप कसा योनीमार्गात ढकलायचा हा थोडासा अवघड प्रकार वाटू शकतो. पण काही महिने सलग वापरल्यानंतर ही गोष्ट व्यवस्थित जमू शकते.एकदा तुम्हाला वापर नीट जमला की मेन्स्ट्रुअल कप सारखी सोयीची आणि सुरक्षित गोष्ट दुसरी कुठलीही नाही.

वयात आलं की प्रत्येकच मुलीला मासिक पाळी येते. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या रक्तस्रावापासून कपड्यांवर डाग पडू नयेत यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. मासिक पाळी दरम्यान मेन्स्ट्रुअल कप वापरणं हा एक सुरक्षित मार्ग असू शकतो. मेन्स्ट्रुअल कप सिलिकॉनपासून बनवलेले असतात आणि शरीरासाठी योग्य असतात. शिवाय मेन्स्ट्रुअल कप पर्यावरण पूरक असतात. 

ते कसं?

सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मेन्स्ट्रुअल कप पुन्हा वापरता येतात.   म्हणजे एक कप स्वच्छ करून परत परत वापरता येतो. पॅड्स आणि टॅम्पोन्स प्रमाणे याचा कचरा तयार होत नाही. शिवाय इतर कुठल्याही साधनांपेक्षा कपमुळे जास्त रक्त गोळा होऊ शकतं.

मेन्स्ट्रुअल कप वापरण्याची पद्धत
१) मेन्स्ट्रुअल कप निवडण्यापूर्वी तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांशी बोलून घ्या. कारण कप्समध्ये वेगवेगळे आकार  येतात. तुम्हाला तुमचा गर्भाशयाच्या मुखाचा आणि योनीमार्गाचा आकार यानुसार कप निवडावा लागेल. त्यामुळे डॉक्टरांशी बोलून मग विकत घ्या.
२) कप वापरण्याआधी हात स्वच्छ धुवा.
३) जर तुम्ही नव्यानं वापरत असाल तर कपला एखादं वॉटर बेस ल्युब्रिकंट लावून मग योनीमार्गात ढकलणं सोयीचं असेल.
४) कप हातात पकडून बरोबर मधोमध उभा इंग्लिश सी लेटरच्या आकारात फोल्ड करा. कपचं तोंड (म्हणजे गोल उघडा भाग) वरच्या बाजूला हवं.
५) आता हळूच ल्युब्रिकंट लावलेला कप हळूच योनीमार्गात सरकवा.
६) पूर्ण कप योनीमार्गात गेला पाहिजे. सर्विक्स च्या खालपर्यंत आत गेला पाहिजे.
७) आत ढकलल्यानंतर कप किंचित गोल फिरवा. त्यामुळे एअर टाइट सील योनीमार्गात तयार होतं आणि कपमधून रक्त गळत नाही.
८) कप योनीमार्गात नीट बसला असेल तर तुम्हाला त्रास होणार नाही. कप घालून तुम्ही तुमच्या नेहमीच्या सगळ्या गोष्टी करू शकता.
९) कप कसा योनीमार्गात ढकलायचा हा थोडासा अवघड प्रकार वाटू शकतो. पण काही महिने सलग वापरल्यानंतर ही गोष्ट व्यवस्थित जमू शकते.
१०) एकदा तुम्हाला वापर नीट जमला की मेन्स्ट्रुअल कप सारखी सोयीची आणि सुरक्षित गोष्ट दुसरी कुठलीही नाही.

मेन्स्ट्रुअल कप काढायचा कसा ?
१) मेन्स्ट्रुअल कप नीट आतमध्ये बसला असेल तर तुम्ही जोवर तो काढत नाही, कप निघत नाही. किंवा निसटून येत नाही.
२) काहीवेळा अति रक्तस्त्राव झाला तर कपमधून रक्त बाहेर पडण्याची आणि पॅंटी खराब होण्याची शक्यता असते. पण ठराविक काळानंतर कप काढून स्वच्छ करून वापरला तर कप ओव्हर फ्लो होण्याची शक्यता टाळता येते.
३) कप काढताना तुमचा अंगठा आणि पहिल्या बोटात कपची मागची बाजू पकडा. कपला मागे छोटं टोक असतं ते चिमटीत धरून हळूच ओढून कप बाहेर काढता येऊ शकतो.
४) कप बाहेर काढल्यावर टॉयलेटमध्ये आत साठलेलं रक्त टाकून द्या. फ्लश करा. कप वाहत्या पाण्यानं स्वच्छ धुवा आणि परत वापरा.
५) मासिक पाळी संपल्यानंतर कप स्वच्छ गरम पाण्यानं धुवून किंवा गरम पाण्यात उकळून, कोरडा करून व्यवस्थित कोरड्या जागी ठेवून द्या.
ज्या मुली/स्त्रिया सेक्शुअली ऍक्टिव्ह आहेत त्यांच्यासाठी मेन्स्ट्रुअल कप अधिक सोयीचे असतात. अर्थात असं असलं तरीही मेन्स्ट्रुअल कप कुणीही वापरू शकतं. होणारा फ्लो कसा आहे ते बघून दर ६ ते १२ तासांनी कप रिकामा करून, स्वच्छ धुवून वापरला पाहिजे. दर मासिक पाळीच्या वेळी वापरण्याआधी कप उकळत्या पाण्यात निर्जंतुक करून घ्यावा आणि मग वापरावा. हल्ली डिस्पोजेबल कप्सही मिळतात. जर तुम्ही ते वापरणार असाल तर प्रत्येक वापरानंतर कप व्यवस्थित फेकून द्या.

विशेष आभार: डॉ. रिना वाणी
(MD, FRCOG, DNB, DGO, FCPS, DFP, FICOG)

Web Title: Using a menstrual cup during menstruation is a safe and convenient option ... how is it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.