Join us   

Sexual Health : गर्भधारणेच्या भितीनं 'त्या' इर्मजन्सी गोळ्या घेण्याचा फायदा की तोटा? तज्ज्ञ सांगतात... 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 2:02 PM

Sexual Health : कुतुहलामुळे, आकर्षणामुळे, चुकीच्या कल्पनांमुळे आणि मित्रांच्या दबावामुळे लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यास प्रवृत्त होता?

डॉ. गीता वडनप 

तरूण वयातील लैंगिक भावनेची इच्छा विकसित होणं ही खरंतर मानवाच्या अनेक महत्त्वाच्या वाढींमधील ही एक महत्वाची पायरी आहे. पौगंडावस्थेकडून सज्ञान व्यक्ति होताना लैंगिक भावना समृध्द होणं ही सुध्दा त्या व्यक्तिच्या शारिरीक-मानसिक विकासाच्या अनेक लक्षणांपैकी एक लक्षण आहे. पूर्वीच्या तुलनेत सध्या किशोरवयीन मुला-मुलीं मधे लैंगिक संबंधचा अनुभव  लवकर घेण्याकडे कल दिसून येतो. (Advantages  and disadvantages of contraceptive pills)

सध्या दिसून येणाऱ्या सोशल मिडियाच्या अनेक प्रणालींतून लैंगिकतेच्या संबंधी असणाऱ्या मेसेजेसचा , दृश्य-फितींचा सुळसुळाट पहायला मिळतो. त्यामुळे अनेक तरूण-तरूणी कुतुहलामुळे , आकर्षणामुळे , चुकीच्या कल्पनांमुळे आणि मित्रांच्या दबावामुळे लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यास प्रवृत्त होतात. मुक्त लैंगिक संबंधामधे होऊ शकणारी गर्भधारणा टाळण्यासाठी डॅाक्टर सल्ल्याशिवाय , स्वत:च्या मनाने चुकीच्या गर्भनिरोधक  वापर खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो. कालांतराने यांचे दिसून येणारे परिणाम अतिशय घातक ठरू शकतात. 

गर्भधारणा टाळण्यासाठी आपल्याकडे अनेक सुरक्षित उपाय आहेत. त्यापैकी निरोध वापर हा एक अत्यंत सुरक्षित , सहज अवलंबला जाण्याजोगा सोपा उपाय आहे. ज्यामुळे स्त्री कडून पुरूषाकडे अथवा पुरूषाकडून स्त्रीकडे प्रसार होऊ शकणारे अनेक आजार आपण निश्तितपणे टाळू शकतो. उदा:गुप्तरोग , HIV , AIDS. 

कुटुंबनियोजना साठी असणाऱ्या रोज घ्यायच्या गोळ्या (बर्थ कन्ट्रोल पिल्स ), कॉपर टी आणि हार्मोनल इंट्रायूट्रिन डिवाइस दर तीन महिन्यांनी घ्यायचं इंजेक्शन, त्वचेच्या खाली इम्प्लांट करायच्या गोष्टी यांचा समावेश होतो. (गर्भधारणेचा निर्णय झाला की डिव्हाइस, इंप्लांट काढून टाकता येतं.)

इमर्जन्सी गर्भनिरोधक 

कुठलीही काळजी न घेता शारीरिक संबंध आल्यावर आणि गर्भधारणा नको असेल तर घेतल्या जाणाऱ्या गोळीला इमर्जन्सी कॉंट्रासेप्शन म्हटलं जातं. याचा वापर खरंतर बर्थ कन्ट्रोल पिल घ्यायची विसरली असलयास , फाटलेला कंडोम अथवा बळजबळीने झालेला लैंगिक संबंध या अश्या केसेस मधे अपेक्षित आहे. पण बऱ्याचदा या गोळीचा दुरुपयोग केला जातो. कुठल्याही सुरक्षेशिवाय झालेल्या संभोगानंतर ७२ तासांच्या आत ही गोळी घेणं गरजेचं असतं.

म्हणजे मग गर्भधारणेची शक्यता नाहीशी होते. त्यामुळे अनेकदा सुरक्षित शरीर संबंधांना महत्व न देता इमर्जन्सी गर्भनिरोधक गोळी घेण्याकडे कल असतो. पण या गोळ्या जर दीर्घकाळ घेतल्या गेल्या तर त्यांचे अनेक दुष्परिणाम शरीरावर होतात. त्याचप्रमाणे ७२ तासांनंतर ही गोळी घेतली तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. 

सध्या असं दिसून येतंय की तरूण मुले-मुली लैंगिकसंबंधांच्या दरम्यान पुरेशी काळजी न घेता गर्भनिरोधक असणारी इमर्जन्सी पिल (जिला मॅार्निग आफ्टर पिल असंही म्हंटल जातं) चा वापर खूप जास्त प्रमाणात करतात. अशा केसेस मधे समागमाच्या वेळेस पुरूषाला कसलाच अडसर नको असतो आणि ईमर्जन्सी पिल घ्यायची जबाबदारी त्या स्त्रीवर  येते. पण या अशा जास्त मात्रेचे प्रमाण असणाऱ्या हार्मोन्सच्या गोळ्यांच्या चुकीच्या वापराने अनेक दुष्परिणाम स्त्रीच्या शरीरावर दिसून येत आहेत.    उदा :-/मळमळ , स्तनामधे हुळहुळणे , स्तनामधे दुखणे , डोकेदुखी , थकवा येणे , पोटात दुखणे , गरगरणे , चिडचिड होणे , वजन वाढणे , मासिक पाळी अनियमित होणे , दोन मासिकपाळी मधे रक्तस्त्राव होणे , अती रक्तस्त्राव होणे , लिबिडो ( समागमाची इच्छा कमी होणे ) . 

१) स्त्रीला उच्चरक्तदाबाचा त्रास असेल , हाय कोलेस्टेरॅाल ची हिस्ट्री असेल तर रक्तप्रवाहात गुठळी होण्याची शक्यता दिसून येते. 

२) मधुमेह असणाऱ्या , धुम्रपान करणाऱ्या , लठ्ठ असणाऱ्या  स्त्रियांमधे हार्मोन्स गोळ्यांच्या सेवनाने रक्कप्रवाहात गुठळी होण्याचा धोका वाढतो. 

३) एका सर्वेक्षणा नुसार सध्या सर्वसाधारणपणे स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर स्तनाच्या कर्करोगासाठी धोकादायक ठरू शकतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे डॅाक्टरांचा सल्ला न घेतां , गर्भनिरोधक गोळ्यांच्या चुकीच्या वापराने यावर नमुद केलेल्या दुष्परिणामांची शक्यता नाकारता येत नाहीच पण त्याच बरोबर अनेक रोगांचे संक्रमणही टाळले जात नाही.

 

(लेखिका स्त्रीआरोग्य तज्ज्ञ-चिकित्सक आहेत.)

geetawadnap@gmail

टॅग्स : स्त्रियांचे आरोग्यहेल्थ टिप्सआरोग्यलैंगिक जीवनलैंगिक आरोग्य