रात्रीची झोप ही आपल्याला दिवसभरासाठी ऊर्जा देणारी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. उत्तम आरोग्यासाठी उत्तम आहार, व्यायाम जितका महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे ७ ते ९ तासांची शांत झोपही तितकीच गरजेची असते. पण अनेकदा आपल्याला ७ तास झोपलो तरी झोप पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही, झोपेतून उठल्यावरही थकवा आल्यासारखे होते. आता यामागे नेमके कारण काय असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर, आपली झोपण्याची पोझिशनही या गोष्टीला कारणीभूत असू शकते. वेळेवर झोपणे तर महत्वाचे आहेच, परंतु रात्रीच्या चांगल्या झोपेमध्ये झोपण्याच्या स्थितीची देखील महत्त्वपूर्ण भूमिका असते (3 Best Postures of Sleep For Good Sleep).
संशोधकांच्या म्हणण्यानुसार आपण अंदाजे ३० वर्षे अंथरुणावर घालवतो, त्यापैकी 7 वर्षे झोपण्याच्या प्रयत्नात जातात. झोपेची स्थिती आरामदायी असेल तर रक्तदाबाचे नियमन होण्यास मदत होते. झोपण्याच्या स्थितीवर आपली विश्रांती आणि आराम अवलंबून असतो. मात्र याबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसल्याने आपण त्याकडे गांभिर्याने पाहत नाही. पालथे किंवा पाठीवर झोपण्यापेक्षा डाव्या बाजूला झोपण्याचे अनेक फायदे तज्ज्ञ सांगतात.
डाव्या कुशीवर झोपण्याची फायदे
- छातीत जळजळ, ऍसिड रिफ्लक्स आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो
- श्वासोच्छ्वास क्रिया चांगली होते.
- घोरणे आणि स्लीप एपनियाचा धोका कमी होतो.
- रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होण्यास मदत होते
- पाठदुखी कमी होते
झोपण्याच्या पोझेस कशी मदत करतात?
आपल्या शरीरात नैसर्गिक वक्र आणि मोकळ्या जागा असतात, ज्या सहसा झोपेच्या स्थितीत अवघडलेल्या राहतात. त्या जागांना आराम देण्यासाठी उशा मदत करतात. उशांची मदत घेतली तर आकुंचन पावलेल्या स्नायूंना आराम मिळण्यास मदत होते. या अतिरिक्त कुशनिंगमुळे स्नायूंना आराम मिळतो आणि झोप येण्यास मदत होते.
या पोझिशन्स ठरु शकतात आरामदायी...
1.टेडी बेअर उशी : उशीला मिठी मारल्याने वरच्या खांद्याला आधार मिळतो. हा खांदा सतत गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली असल्याने त्याला काही प्रमाणात ताण येतो. अशावेळी उशीला जवळे घेऊन झोपणे केव्हाही उत्तम.
2.क्रॉच उशी : तुमच्या क्रॉच भागात उशी ठेवल्याने पायांना आणि संपूर्ण शरीराला एकप्रकारचा आधार मिळण्यास मदत होते. पाय हा शरीरातील सर्वात जड अवयव आहे. उशी घेतल्याने पायांच्या स्नायूंना आराम मिळतो, यामुळे पायांमधील रक्तदाब कमी होतो शरीराला चांगली विश्रांती मिळते.
3. सँडविच पिलो : बऱ्याच लोकांना गुडघेदुखीचा त्रास असतो. उशी गुडघ्याच्या मध्यभागी ठेवल्याने गुडघ्याच्या सांध्याला विश्रांती मिळते. ज्यामुळे गुडघ्याच्या आजुबाजूच्या सर्व स्नायूंना विश्रांती मिळण्यास मदत होते. या सगळ्या स्थितींमध्ये आपल्याला शांत आणि गाढ झोप लागण्यास मदत होऊ शकते.