Hausala- Activity for help preganant women who face problem in lockdown | अडलेल्या बाईच्या मदतीसाठी धावून जाणारा  हौसला

अडलेल्या बाईच्या मदतीसाठी धावून जाणारा  हौसला

- (मुलाखत : माधुरी पेठकर)

कोरोना, लॉकडाऊन यामुळे एरवी अडचण आली तर वाहणारा मदतीचा ओघ आटलेला. सर्व सरकारी दवाखान्यात कोरोना रुग्णांना प्राधान्य. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांना गरज पडेल तेव्हा तातडीची मदत उपलब्ध करून देण्यासाठी, गर्भवती महिलांची तपासणी, त्यांना उपचाराची सोय मिळवून देण्यासाठी, आणीबाणीच्या प्रसंगात दवाखाना, डॉक्टर उपलब्ध करून देणं, अँम्ब्युलन्सची सोय करून देण्यासाठी काही तरुणांच्या पुढाकारातून ‘हौसला’ या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. या उपक्रमाची संकल्पना पिंपरी चिंचवड येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर राहुल इंगळे यांची. त्यांच्याशी या उपक्रमाविषयी झालेल्या या गप्पा :
हौसला हा उपक्रम कसा सुरू केला?
- त्यासाठी एक घटना कारणीभूत ठरली. मी दवाखान्यात होतो. संध्याकाळची वेळ होती. एक बिहारची महिला अवघडलेल्या अवस्थेत दवाखान्यात आली. ती बिहारची असल्यामुळे इथल्या दवाखान्यात तिची नोंद नव्हती. तपासणीच्या नोंदी नव्हत्या. त्यामुळे तिची परिस्थिती, बाळाची परिस्थिती याबद्दल काहीच अंदाज नव्हता. मी तिला तपासलं तेव्हा गर्भाशयाचं तोडं उघडलं होतं. त्यामुळे तिला इतर दवाखान्यात पाठवणं फारच धोक्याचं होतं. मी धोका पत्करून तिला दवाखान्यात दाखल करून घेण्याच्या विचारात होतो. पण तिच्यासोबत एक पुरुष नातेवाईक असणं गरजेचं होतं. शासकीय दवाखान्याचा तो नियम होता. मी त्या बाईच्या बरोबर असलेल्या दोन महिलांना हे सांगितलं. पण त्या गप्पच होत्या. तितक्यात एक पुरुष माङयासमोर उभा राहिला आणि मी त्या बाईचा नातेवाईक आहे असं म्हणाला. त्या बाईची दवाखान्यात प्रसूती केली.  बाळाला आईकडे सोपवून मी लेबर रूममधून बाहेर आलो. थोडय़ावेळानं मला सिस्टरनं सांगितलं की, कागदपत्रंवर सह्या करणारा तो पुरुष या बाईचा नातेवाईक नसून रिक्षावाला होता. त्या बाईला दवाखान्यात तातडीची मदत मिळवून देण्यासाठी तो खोटं बोलला होता!
- त्यादिवशी रात्रभर मी झोपलो नाही. अशा कितीतरी महिला रोज अडचणीत येत असतील. त्यांना कोण मदत करत असेल? आपण काही करायचं का? या विचारानं माझं डोकं पोखरलं. मी सिंधुदुर्ग येथील माङया डॉक्टर मित्रला फोन केला. या परिस्थितीत आपण गरोदर महिलांना कशी मदत करू शकतो हे सांगितलं. त्याला ही कल्पना आवडली. आणि त्यातूनच   ‘हौसला’ची निर्मिती झाली. मग याचं स्वरूप ठरवायच्या कामाला आम्ही लागलो. 


हौसलामार्फत गर्भवती महिलांना कशा स्वरूपाची मदत केली जाते?
- मुळातच कोरोनाकाळात सर्व लक्ष कोरोनाकडे आणि कोरोना रुग्णांकडे. त्यामुळे अडचणीत असलेल्या गर्भवती महिलांना सर्वतोपरी मदत उपलब्ध करून द्यायची असं ठरवलं होतं. आपल्या या उपक्रमातून एका जरी महिलेचा जीव आपण वाचवू शकलो तरी ही खूप मोठी गोष्ट असेल हे आम्ही आधीच ठरवलं होतं. शिवाय आर्थिक मदत करण्याचं साधन आमच्याकडे काहीच नव्हतं. त्यामुळे अडचणीत असलेल्या गर्भवती महिलांचा हेल्पिंग हॅण्ड बनायचं आम्ही ठरवलं आणि गरोदर माता, प्रसूत माता, नवजात शिशू यांना आवश्यक असलेली मदत तातडीनं उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज झालो. 
हौसलाचे संपूर्ण महाराष्ट्रासाठी सहा व्हॉट्सअँप ग्रुप आहेत. हौसलाचं फेसबुक पेजही आहे. आमच्याकडे एखादी केस आली, मदत हवी असल्याची मागणी आली की आम्ही लगेच सर्व माहिती व्हॉट्सअँप ग्रुपवर टाकतो.  अडचणीत असलेली महिला ज्या जिल्ह्यातील असेल तिला त्या जिल्ह्यातून तातडीनं मदत उपलब्ध करून दिली जाते.
आम्ही फक्त गर्भवती महिलांनाच नाही तर नवजात बालकांनाही तातडीनं मदत उपलब्ध करून देतो. एकदा  नवजात बाळाला श्वास घ्यायला त्रस होतो, काय मदत करता येईल अशी विचारणा आमच्याकडे झाली. तेव्हा एनआयसीयूची आवश्यक यादी आमच्याकडे नव्हती. खूप खटपटीनंतर त्या बाळासाठी व्हेण्टिलेटरची सोय झाली; पण तोर्पयत उशीर झाला होता. त्या रात्री आम्ही सर्वजणांनी जागून संपूर्ण महाराष्ट्रातील एनआयसीयूची यादी केली. आज आई किंवा नवजात बाळाला मदतीची गरज असेल तर आमचं संपूर्ण महाराष्ट्रात नेटवर्क तयार झालं आहे. त्यामुळे रुग्ण कुठलाही असला तरी वेळेवर मदत मिळेल हे नक्की. 
हौसला गरजू महिलांर्पयत कसा पोहोचला?
-  31 मार्चला एका गर्भवती महिलेला कोणत्याच दवाखान्यात प्रवेश मिळाला नाही, आणि तिनं रिक्षात प्राण सोडला. ही घटना वाचून वाटलं की, तिला जर हौसलाची माहिती असती तर ती नक्की आपल्यार्पयत पोहोचू शकली असती. या घटनेनंतर आपण जास्तीत जास्त लोकांर्पयत पोहोचायला हवं अशी गरज निर्माण झाली. आम्ही आधी फेसबुकवरून जाहिरात करायला सुरुवात केली. मग वर्तमानपत्रं, एफ एम रेडिओ या माध्यमांच्या मार्फत आम्ही लोकांर्पयत, गरजू महिलांर्पयत पोहोचलो. मार्चपासून आतार्पयत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात अशा 1क्क् गर्भवती महिलांना मदत केली आहे.
हौसलाची टीम मग खूप मोठी असेल ना?
- नाही. आम्ही केवळ आठजण आहोत. यात फक्त तीन जण डॉक्टर आहेत. एक जण आधी माझा पेशण्ट होता तोच आता माझा सहकारीही आहे. एक फेसबुक मित्र होता त्याला ही कल्पना आवडली आणि तो आम्हाला जॉइन झाला. आम्ही तीन डॉक्टर सोडले तर बाकी सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रतले आहेत. या मुलांकडे क्रिएटिव्हिटी आहे, काहीतरी करण्याची त्यांना हौस आहे.  आज चार महिने झाले काम सुरू होऊन; पण अजून आम्ही कोणीच प्रत्यक्ष एकमेकांना भेटलेलो नाही. पण लवकरच प्रत्यक्ष भेटून आम्ही यापुढच्या कामाची दिशा ठरवणार आहोत.
हौसला हा उपक्रम कोरोनाकाळापुरताच मर्यादित असेल, की त्यानंतरही काम करायचं तुम्ही ठरवलं आहे?
- सुरुवातीला कोरोना, लॉकडाऊन या काळापुरताच आपला उपक्रम चालवायचा असं ठरलं होतं. पण आता हे काम थांबवू नका, अशी मागणी लोकांकडूनच होत आहे. त्यामुळे आम्हीही आमचं उद्दिष्ट व्यापक केलं आहे. आम्ही या चार-पाच महिन्यात मोठय़ा प्रमाणात शहरी भागात पोहोचलो. पण ग्रामीण भागात हवी तेवढी मदत करता आली नाही. आज खरं तर ग्रामीण भागात आमच्या मदतीची गरज जास्त आहे. म्हणूनच ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गाव खेडय़ातील गरजू गर्भवती महिलांना आणि नवजात बालकांना मदत उपलब्ध करून देण्याचं आमचं ध्येय आहे.

 

 

Web Title: Hausala- Activity for help preganant women who face problem in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.