नारळाचे झाड हे खरोखरच निसर्गाने दिलेले एक वरदान आहे. या झाडाचा प्रत्येक भाग मानवाच्या उपयोगाचा आहे. नारळाच्या खोडाचा वापर मजबूत बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर होतो. (World Coconut Day 2025: Coconut is a multiuse tree , see the amazing and beautiful uses of every part of the coconut tree!)त्याच्या कठीण लाकडापासून घराचे खांब ते फर्निचर अनेक वस्तू केल्या जातात. ग्रामीण भागात तर त्याचा वापर उंबरठे, दारांच्या चौकटी किंवा घराच्या छपराच्या आधारासाठी केला जातो.
नारळाच्या झावळ्यांचाही तेवढाच उपयोग आहे. या पानांच्या शेंड्यांपासून सण-उत्सवात सजावटीच्या वस्तू तयार होतात, तर त्याच्या हीरांचा वापर झाडू करण्यासाठी होतो. नारळाच्या झावळ्यांचा हिरवा भाग उन्हाळ्यातील उष्णतेपासून बचाव करण्यासाठी छपरावर घालतात. तसेच झावळीची चटई, टोपल्या, पंखे तयार केले जातात.
नारळाचे पाणी हे आरोग्यासाठी फार फायद्याचे मानले जाते. उष्णता काढून शरीराला थंडावा देणारे, पचनाला हलके आणि पौष्टिक असे हे पाणी औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. खोबरं, खवलेला नारळ म्हणजे भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचे गोड पदार्थ, चटण्या, खोबरेल तेल, नारळाचे दूध आदी. तयार केले जाते. खोबरेल तेलाचा वापर स्वयंपाकापुरता मर्यादित न राहता केसांसाठी, त्वचेसाठी आणि औषधोपचारासाठीही केला जातो. सुक्या खोबऱ्याचा उपयोग मिठाईत तसेच विविध मसाल्यांत चव वाढविण्यासाठी केला जातो.
नारळाची झाडे समुद्रकिनारी जास्त आढळतात. नारळाच्या खोडाचा नाव, बोट तयार करण्यासाठीही वापर केला जातो. खोड तसं मजबूत असते. उचलण्यासाठी हलकेही असते, त्यामुळे त्याचा वापर विविध प्रकारे केला जातो. नारळाच्या सुकलेल्या झावळ्याही उपयुक्त ठरतात. त्याचा वापर जाळवणासाठी केला जातो. तसेच कचऱ्याची गटारे बंद करण्यासाठी केला जातो.
नारळाच्या करवंटीचा उपयोग घरगुती भांडी, कोळसा तयार करण्यासाठी, तसेच शोभेच्या वस्तूंमध्ये केला जातो. जाळवणासाठीही केला जातो. करवंट्याच्या कठीण भागातून चमचे, वाट्या किंवा सजावटीचे शोपीस बनवले जातात. करवंट्यापासून तयार होणार्या कोळशाचा वापर धुपाच्या काड्यांसाठीही करता येतो.
एकूणच नारळाचे झाड हे अन्न, घर, औषध आणि रोजगार देणारे झाड आहे. खोड, पानं, फळ, प्रत्येक भाग उपयोगी पडतो. म्हणूनच नारळाच्या झाडाला विशेष महत्व आहे.