मागच्या काही दिवसांत महाराष्ट्र्रात सगळीकडेच खूप जोरदार पाऊस झाला. काही भागात तर ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला. शेतीमालाचं प्रचंड नुकसान झालं. रोपांना जगण्यासाठी पावसाचं पाणी हवं असतं, हे खरंय. पण त्या पाण्याचा अतिरेक झाला तरी रोपाचं नुकसान होतं. तेच सध्या अनेक भागात झालं आहे. अगदी आपल्या टेरेसमधल्या, अंगणातल्या काही रोपांनाही पावसाचा अतिरेक सहन झालेला नाही. त्यामुळे सध्या असं दिसतंय की कुंडीतल्या मातीच्या वरच्या थरावर शेवाळं जमा झालेलं असून माती जरा कडक, चिकट झाली आहे. यावर त्वरीत उपाय केला नाही तर रोपांच्या मुळांना पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही आणि ती सडून जातात.(what to do if soil in pot becomes sticky?)
कुंडीतल्या मातीवर शेवाळ जमा झालं?
ज्यादिवशी स्वच्छ ऊन पडलेलं असेल त्यादिवशी पुढे सांगितलेले उपाय करा. कारण आता रोपांना भरपूर पाणी मिळालेलं असल्याने त्यांना उन्हाची गरज आहे.
कुंडीतल्या मातीवर जर शेवाळ तयार झालं असेल तर सगळ्यात आधी जे शेवाळ तयार झालेलं आहे ते अलगदपणे वरवर काढून घ्या.
यानंतर मग छोटीशी खुरपणी घ्या आणि कुंडीतली माती सगळीकडून थोडी थोडी उकरून घ्या. माती उकरताना रोपाच्या मुळांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या.
माती उकरून झाल्यानंतर ती कुंडी काही तास तशीच उन्हामध्ये ठेवून द्या. त्यानंतर दुसऱ्यादिवशी थोडीशी रेती घ्या. त्यामध्ये रेती जेवढी घेतली असेल तेवढ्याच प्रमाणात गांडूळ खत किंवा मग कंपोस्ट खत घ्या. हे मिश्रण आता कुंडीतल्या उकरलेल्या मातीमध्ये टाका. यामुळे मातीचा भुसभुशीतपणा आणि कसदारपणा वाढेल. त्यामुळे मग रोपाच्या मुळांना पुरेपूर सुर्यप्रकाश मिळून त्यांची चांगली वाढही होईल.