बाहेर पाऊस पडायला सुरूवात झाली की, घरातल्या बच्चे कंपनीसोबतच मोठ्या माणसांनाही काही तरी गरमागरम, चटकदार खाण्याची इच्छा होते. काेसळणारा पाऊस आणि त्यासोबत मस्त मसालेदार वाफाळता चहा असला तरी आणखी काही स्पेशल असावे असे वाटू लागते. म्हणूनच तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अगदी मुबलक मिळणारे आणि अतिशय हेल्दी असणारे स्वीटकॉर्न पाऊस बघत असताना खायला मिळणे, म्हणजे पाऊसप्रेमींसाठी निव्वळ सूख आणि सूख... स्वीटकॉर्नच्या या काही हेल्दी रेसिपीज ट्राय करून पहा आणि पाऊस एन्जॉय करा.
१.चिजी बटर स्वीटकॉर्न
ही रेसिपी अतिशय सोपी आहे. यासाठी सगळ्यात आधी तर स्वीटकॉर्नचे दाणे काढून ते मायक्रोव्हेव किंवा कुकरमध्ये टाकून उकडून घ्या. यानंतर एका बाऊलमध्ये हे गरमागरम दाणे काढून त्यावर बटर टाका आणि थोडा चाट मसाला टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यावरून किसलेले चीज टाका. चीज आणि बटरचा फ्लेवर स्वीटकॉर्नची ओरिजनल टेस्ट आणखीनच लाजवाब बनवतो.
२. मसाला स्वीटकॉर्न
ज्यांना स्वीटकॉर्न थोेडे स्पाईसी खायला आवडत असेल, त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघावी. उकडलेले स्वीटकॉर्नचे दाणे एका बाऊलमध्ये घ्या. यावर थोडे लाल तिखट, मीरे पावडर, ओरिगॅनो टाका. लाल तिखट टाकण्याऐवजी चिलीफ्लेक्सही वापरता येईल. वरून थोडेसे लिंबू पिळा आणि पाऊस बघत बघत ही स्पाईसी रेसिपी संपवून टाका.
३. स्वीटकॉर्न भेल
हा पदार्थही सगळ्या वयोगटातील लोकांना आवडण्यासारखा आहे. यासाठी आपल्याला स्वीटकॉर्नचे उकडलेले दाणे वापरायचे आहेत. स्वीटकॉर्नच्या उकडलेल्या दाण्यांमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काेथिंबीर टाका. थोडे लाल तिखट आणि मेयोनीजही ॲड करा. यामध्ये आपण पनीरचे तुकडेही टाकू शकतो. हे सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि गरमागरम सर्व्ह करा.