Join us

हिवाळा स्पेशल : थंडीच्या दिवसांत करा मटार उसळचा चविष्ट बेत, घ्या परफेक्ट रेसिपी, हिवाळा करा स्पेशल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2022 09:40 IST

Winter Special Matar Green Peas Usal Recipe : गरमागरम मटार उसळ आणि ब्रेड किंवा पुरी हा थंडीच्या दिवसांत आवर्जून केला जाणारा पदार्थ.

ठळक मुद्देही उसळ ब्रेड किंवा पुऱ्या, गरम फुलके, पोळी कशासोबतही अतिशय छान लागते. काजू, कांदा, खोबरं यामुळे ग्रेव्हीला घट्टपणा येतो आणि पुदीना, कोथिंबीर आणि मिरचीमुळे छान हिरवा रंग येतो.

थंडीच्या दिवसांत खाण्याची चंगळ असते. बाजारात आधीच भाजीपाला भरपूर उपलब्ध असतो. इतकंच नाही तर या काळात खाल्लेले अन्न पचतेही चांगले. या काळात बाजारात लालेलाल गाजरं, बोरं, मटार, पालेभाज्या भरपूर प्रमाणात येतात. ताजा हिरवागार मटार बाजारात असल्याने या काळात मटारचे बरेच पदार्थ केले जातात. यामध्ये मटार भात, पावभाजी, मटार करंजी, मटार पराठा यांबरोबर सगळ्यांच्याच आवडीचा आणखी एक पदार्थ असतो, तो म्हणजे मटार उसळ. गरमागरम मटार उसळ आणि ब्रेड किंवा पुरी हा थंडीच्या दिवसांत आवर्जून केला जाणारा पदार्थ. चविष्ट अशी मटार उसळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. पण कधी याचं प्रमाण चुकतं तर कधी चव. पाहूया मटार उसळ परफेक्ट करण्याची सोपी रेसिपी (Winter Special Matar Green Peas Usal Recipe)...

(Image : Google)

साहित्य -

१. मटार - ३ ते ४ वाट्या२. खोबरं - अर्धी वाटी ३. आलं - १ ते २ इंच ४. लसूण - ७ ते ८ पाकळ्या ५. मिरच्या - २ ते ३ ६. कांदा - १ ७. काजू - ६ ते ८८. पुदिना - १ वाटी ९. कोथिंबीर - १ वाटी १०. मीठ - चवीनुसार ११. साखर - चवीनुसार १२. धणे- जीरे पावडर - अर्धा चमचा १३. तेल - २ चमचे १४. फोडणीचे सामान  

कृती -

१. मटार सोलून स्वच्छ धुवून घ्यावेत.२. कांदा चिरुन आणि खोबऱ्याचे बारीक काप करुन घ्यावेत. ३. आलं, मिरची, लसूण, कोथिंबीर, पुदीन, खोबरं, काजू, कांदा मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पेस्ट करुन घ्यावी.४. कढईत तेल घालून त्यामध्ये मोहरी, जीरं, हिंग, हळद घालून त्यामध्ये ही पेस्ट टाकून चांगली परतून घ्यावी.५. त्यात मटार घालून अंदाजे पाणी घालावे. ६. सगळे चांगले एकजीव करुन त्यामध्ये धणे-जीरे पावडर, मीठ आणि साखर घालावी.७. एक उकळी आली की गॅस बारीक करुन झाकण ठवून चांगले शिजू द्यावे.८. काजू, कांदा, खोबरं यामुळे ग्रेव्हीला घट्टपणा येतो आणि पुदीना, कोथिंबीर आणि मिरचीमुळे छान हिरवा रंग येतो. ९. ही उसळ ब्रेड किंवा पुऱ्या, गरम फुलके, पोळी कशासोबतही अतिशय छान लागते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.