Join us

पावसाळ्यात अजिबात खाऊ नका दही, पाहा ३ कारणं- पचन बिघडून प्रतिकारशक्तीही होते कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:30 IST

Curd In Monsoon : खासकरून पावसाळ्यात दही खाणं टाळणं आरोग्यासाठी जास्त फायदेशीर.

Curd In Monsoon : दही हा एक असा पदार्थ आहे जो भारतीय घरांमध्ये नेहमीच खाल्ला जातो. याची आंबट-गोड टेस्ट तर चांगली असतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. दह्यात भरपूर प्रोबायोटिक्स आणि हेल्दी फॅट्स असतं. पण आयुर्वेदानुसार, वातावरणात बदल झाल्यावर काही गोष्टी खाणं टाळलं पहिजे. खासकरून पावसाळ्यात दही खाणं टाळणं आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकतं किंवा कमी खावं. याचं कारण काय तेच समजून घेऊया.

पावसाळ्यात दही का टाळावं?

आयुर्वेदानुसार, पावसाळ्यात दही खाल्ल्यानं शरीरात वात, पित्त आणि कफ दोष वाढू शकतो. ज्यामुळे शरीर कमजोर होतं आणि अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. अशात अशीही कारणं आहेत ज्यामुळे पावसाळ्यात दही खाणं टाळलं पाहिजे.

पावसाळ्यात दही खाल्ल्यानं काय होतं?

पचनासंबंधी समस्या

दही थंड असतं आणि आयुर्वेद सांगतं की, थंड पदार्थांमुळे पचनक्रिया कमजोर होते. यानं पोट फुगणं, गॅस आणि अपचन अशा समस्या होतात. हेच कारण आहे की, दह्यात नेहमीच चिमुटभर काळी मिरी पूड, भाजलेलं जिरं किंवा मध टाकावं. कारण दही फक्त तसंच खाल्लं तर यानं पचनक्रिया स्लो होऊ शकते.

इम्यून सिस्टीम कमजोर होतं

आयुर्वेद सांगतं की, पावसाळ्यात दह्यासारखे थंड डेअरी प्रॉडक्ट्स खाल्ल्यानं इम्यून सिस्टीम कमजोर होते. थंड पदार्थ अधिक खाल्ल्यानं कफ वाढतो, ज्यामुळे पोट बिघडतं. वेगवेगळे आजार आणि इन्फेक्शनचाही धोका असतो.

श्वासासंबंधी समस्या

पावसाच्या दिवसांमध्ये नेहमीच दही खात असाल तर शरीरात कफ खूप वाढतो. ज्यामुळे  सर्दी, खोकला आणि छातीत घट्टपणा जाणवू शकतो. त्यानंतर वेगवेगळ्या आजारांचा आणि अ‍ॅलर्जीचा धोका वाढतो.

दही खाण्याची पद्धत

जर तुम्हाला पावसाच्या दिवसांमध्ये दही खायचं असेल तर, योग्य पद्धतीनं खाणं महत्वाचं ठरतं. दह्यात चिमुटभर जिरे पावडर, काळी मिरी पूड आणि काळं मीठ किंवा मध मिक्स करा. असं केल्यानं दह्यातील थंड प्रभाव संतुलित होतो. तसेच आतड्यांचं आरोग्यही चांगलं राहतं.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स