Difference between White Guava vs Pink Guava: पेरू हे असं फळ आहे ज्याची आंबट-गोड चव सगळ्यांनाच हवीहवीशी वाटत असते. पेरूवर हलकं मीठ आणि तिखट टाकून खाण्याचा जो काही आनंद मिळतो, तो शब्दात सांगण्यासारखा नसतोच. पण फक्त चवीपुरतं नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही पेरू ‘सुपरफूड’ मानलं जातं. यात व्हिटामिन, मिनरल्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. ज्यांचे शरीराला अनेक फायदे मिळतात. बाजारात आपण पाहिलं असेल तर दोन प्रकारचे पेरू मिळतात, पांढरे आणि गुलाबी. आता काहींना प्रश्न असा पडतो की, या दोन्हींपैकी कोणता पेरू अधिक फायदेशीर आहे? याबद्दल प्रसिद्ध डायटिशियन शिल्पा अरोरा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर माहिती दिली आहे. चला, त्यांच्या मते जाणून घेऊया दोन्ही प्रकारच्या पेरूचे फायदे आणि कोणता पेरू खाणं अधिक चांगलं ठरेल.
गुलाबी पेरूचे फायदे
डायटिशियन सांगतात की गुलाबी पेरूमध्ये लायकोपीन नावाचा अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतो. हा घटक आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानला जातो. नियमितपणे हा पेरू खाल्ल्यास त्वचेला नैसर्गिक गुलाबी चमक मिळते.
गुलाबी पेरूची आणखी एक खासियत म्हणजे यानं जास्त साखरेची आणि जंक फूडची इच्छा कमी होते. नेहमीच काहीतरी गोड किंवा तळलेलं खावंसं वाटत असेल, तर एक गुलाबी पेरू खाल्ल्याने ती क्रेव्हिंग शांत होते.
तसेच काही अभ्यासानुसार, गुलाबी पेरूतील अँटीऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात आणि त्वचेवर वयापूर्वी दिसणाऱ्या सुरकुत्या आणि रेषा कमी करतात.
पांढऱ्या पेरूचे फायदे
शिल्पा अरोरा सांगतात की, वजन कमी करण्यासाठी पांढरा पेरू अधिक फायदेशीर आहे. यात कॅलरी कमी असते आणि गुलाबी पेरूच्या तुलनेत नैसर्गिक साखरेचं प्रमाण कमी असतं. मात्र, फायबरचं प्रमाण जास्त असल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहतं आणि ओव्हरईटिंग टाळता येते.
पांढऱ्या पेरूत गुलाबी पेरूच्या दुप्पट व्हिटामिन C असतं. व्हिटामिन C शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं, त्वचा निरोगी ठेवतं आणि संक्रमणांपासून बचाव करतं. याशिवाय, पांढरा परू पचन सुधारण्यातही मदत करतो.
मग कोणता पेरू खावा?
शिल्पा अरोरा यांच्या मते, दोन्ही पेरू आपल्या-आपल्या पद्धतीने फायदेशीर आहेत. जर तुम्हाला ग्लोइंग स्किन आणि शुगर कंट्रोल हवं असेल, तर गुलाबी पेरू अधिक योग्य आहे. आणि जर आपल्याला वजन कमी करणं व इम्युनिटी वाढवणं असेल, तर पांढरा पेरू निवडा.