Tea Making Tips : चहा हा भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. बहुतांश लोकांची दिवसाची सुरूवात गरमागरम चहानं होते. महिला असोत किंवा पुरूष सगळ्यांनाच सकाळचा चहा हवाच असतो. काही लोक दिवसातून दोन वेळा चहा घेतात तर काही जण दिवसभरात अनेक कप पिण्याची सवय लावून घेतात. चहा प्यायल्यावर फ्रेश वाटतं हा खराच, पण उपाशीपोटी चहा घेतल्यास अॅसिडिटी किंवा गॅसची समस्या होते. खासकरून ज्यांना अॅसिड रिफ्लक्सचा त्रास आहे त्यांच्यासाठी चहा नुकसानकारक असू शकतो.
पण चहा पूर्णपणे सोडणे अनेकांसाठी शक्य नसते. त्यामुळेच, चहा पित असताना अॅसिडिटी टाळण्यासाठी चहा करताना या तीन गोष्टींची नक्की काळजी घ्या. असं केल्यास चहा सुद्धा मिळेल आणि गॅस–अॅसिडिटीही होणार नाही. त्यासोबतच हा चहा ब्लड शुगर, कोलेस्टेरॉल, हृदय व मेंदूच्या कार्यक्षमतेतही सुधारणा करतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतो.
चहा पावडरऐवजी हर्बल घटक वापरा
साध्या चहा पावडरमध्ये कॅफीन मोठ्या प्रमाणात असतं. जास्त कॅफीनमुळे पोटात जळजळ, गॅस, अॅसिडिटी, हायपरटेंशन, एंझायटी, झोपेचे विकार अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्याऐवजी तुम्ही आलं, पुदिना, कॅमोमाइल, तुळस, हिबिस्कस यांसारख्या हर्बल घटकांचा वापर करू शकता.
चहात दूध टाळा
अनेकांना हे मान्य होणार नाही, पण चहा पावडर आणि दूध ही जोडी पचनासाठी चांगली नसते. यामुळे अॅसिडिटी आणि पचनाच्या समस्या वाढू शकतात. दूध स्वतंत्रपणे पिणे शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे.
साखर टाळा
साखर चवीला गोड असली तरी आरोग्यासाठी खूप घातक आहे. जास्त साखरेमुळे लठ्ठपणा डायबिटीसचा धोका वाढतो. त्याऐवजी चहात मध, दालचिनी वापरू शकता.
हर्बल टी पिण्याचे फायदे
पचन सुधारतं
वजन कमी होण्यास मदत
इम्युनिटी वाढते
शरीरातील टॉक्सिन्स दूर होतात
हर्बल चहाची टेस्ट वेगळी असली तरी शरीराला त्याचे फायदे खूप जास्त आहेत.
