पिझ्झा हे अनेक लोकांचं आवडीचं फास्ट फूड आहे जे दिसायला आकर्षक तर आहेच पण खायलाही खूप चविष्ट आहे. मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये याबद्दल खूप क्रेझ आहे, पण ते आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही असं प्रसिद्ध डाएटीशियन आयुषी यादव यांनी सांगितलं. जास्त पिझ्झा खाणाऱ्यांच्या आरोग्याला काय नुकसान होऊ शकतं ते जाणून घेऊया...
जास्त पिझ्झा खाण्याचे वाईट परिणाम
लठ्ठपणा
पिझ्झामध्ये चीज, सॉस असे विविध घटक असतात, जे कॅलरीजचे रिच सोर्स आहेत. जास्त कॅलरीजचं सेवन तुमच्या शरीरासाठी हानिकारक असू शकतं आणि वजन वाढू शकतं.
हृदयासाठी धोकादायक
पिझ्झामध्ये मोझेरेला चीज आणि इतर फिलिंग्ज असतात, जे जास्त फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅटचे सोर्स असतात. जास्त फॅटचं सेवन हृदयाच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतं आणि लिपिड प्रोफाइल बिघडू शकतं.
हाय ब्लड शुगर
पिझ्झा ब्रेडचा मूळ घटक म्हणजे पीठ, ज्यामध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात. हे हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेलं अन्न आहे आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेही रुग्णांसाठी हे विशेषतः धोकादायक आहे.
पोटाच्या समस्या
काही लोक एकाच वेळी खूप जास्त पिझ्झा खातात. बऱ्याच वेळा त्यात तळलेले आणि मसालेदार घटक मिसळले जातात, ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अल्सर आणि अॅसिडिटी होऊ शकते. तसेच, पिझ्झा सामान्यतः पचायला कठीण असतो. त्यामुळे अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता होऊ शकते.