उन्हाळा सुरू झाला की घाम येणे, शरीरात उष्णता वाढणे आणि सतत थकवा जाणवणे हे प्रकार सामान्यच असतात. अशा वेळी शरीराला आतून थंडावा देणारे पारंपरिक पेय म्हणजे वाळ्याचं सरबत. वाळा म्हणजे Chrysopogon zizanioides ही एक सुगंधी औषधी वनस्पती आहे. (Vetiver roots for digestion, Aromatic medicinal roots, Budget-friendly natural health tip)तिच्या मुळांमध्ये नैसर्गिक गारवा देणारे आणि सुगंधी गुणधर्म आढळतात. पूर्वी घरांच्या खिडक्यांना वाळ्याच्या चटई लावून त्यावर पाणी शिंपडले जात असे, ज्यामुळे घरात थंडावा निर्माण होत असे. त्याच वाळ्याच्या मुळांपासून तयार केलेले सरबत उन्हाळ्यात विशेष फायदेशीर ठरते.
वाळ्याचं सरबत करण्यासाठी सर्वप्रथम वाळ्याच्या स्वच्छ मुळ्या हलक्या हाताने धुऊन घ्याव्यात. त्यानंतर त्या काही तास स्वच्छ पाण्यात भिजत ठेवाव्यात, जेणेकरून त्यांचा रंग, सुगंध आणि गुणधर्म पाण्यात उतरतील. भिजवलेले पाणी गाळून घ्यावे. वेगळ्या भांड्यात साखर आणि थोडे पाणी घेऊन हलका पाक तयार करावा. हा पाक पूर्णपणे थंड झाल्यावर त्यात वाळ्याचे गाळलेले पाणी मिसळावे. चव वाढवण्यासाठी इच्छेनुसार थोडासा लिंबूरस घालता येतो. तयार मिश्रणात आवश्यक तेवढे थंड पाणी घालून नीट ढवळावे आणि बर्फाचे तुकडे घालून थंडगार सर्व्ह करावे. बाजारात वाळ्याचे तयार सिरप उपलब्ध असते, परंतु घरच्या घरी तयार केलेले सरबत अधिक नैसर्गिक आणि सुगंधी लागते. त्याची पूड करुनही त्याचे सरबत करु शकता.
वाळ्यात अनेक उपयुक्त गुणधर्म आढळतात. त्याला नैसर्गिक थंडावा देणारे गुण असल्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते. पचनसंस्थेला चालना देऊन अॅसिडिटी आणि पोटातील दाह कमी करण्यास ते सहाय्यक ठरते. वाळ्यातील अँटी ऑक्सिडंट गुणधर्म शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतात. तसेच त्याचा मंद, सुखद सुगंध मन शांत ठेवण्यास आणि ताण कमी करण्यास उपयुक्त ठरतो. काही पारंपरिक उपचारपद्धतींमध्ये वाळ्याचा उपयोग शरीरशुद्धी आणि त्वचेसाठीही केला जातो.
उन्हातून घरी आल्यानंतर किंवा दुपारच्या कडक उन्हात वाळ्याचं सरबत पिणे विशेष लाभदायक असते. मात्र साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. मधुमेह असणाऱ्यांनी साखरेऐवजी गुळाचा वापर मर्यादित प्रमाणात करावा. नेहमी शक्यतो ताजे तयार केलेले सरबतच पिणे उत्तम. सरबत आवडत नसेल तर पाण्यात वाळ्याची मुळी ठेवावी आणि तेच पाणी प्यावे. फार लाभदायक असते.
