चंपाषष्ठीचा उत्सव लवकरच घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्ताने खंडोबासाठी जो नैवेद्य केला जातो तो अतिशय वेगळा असतो. एरवी कधी कोणत्या नैवेद्यात नसलेले पदार्थ या दिवशी केले जातात. म्हणजेच वांग्याचं भरीत, भाकरी, कांद्याची पात असे या नैवेद्यामधले काही महत्त्वाचे पदार्थ. काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवला जातो. पण पुरणासोबतच जोडीला वांग्याचं भरीतही असतंच. म्हणूनच या दिवशी घरोघरी भरीत केलं जातं. आता तुम्हालाही चंपाषष्ठीनिमित्त अस्सल गावरान पद्धतीने केलेलं भरीत चाखून पाहायचं असेल तर पुढे सांगितलेली रेसिपी एकदा ट्राय करून पाहा..(vangyacha bharit recipe in Marathi)
वांग्याचं भरीत करण्याची रेसिपी
साहित्य
२ मध्यम आकाराचे भरीताचे वांगे
२ मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे
हिवाळा स्पेशल रेसिपी- आवळ्याचं तिखट- गोड चटपटीत लोणचं, १५ मिनिटांत लोणचं तयार...
४ ते ५ हिरव्या मिरच्या आणि ८ ते १० लसूण पाकळ्या
२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१ टेबलस्पून तेल आणि चवीनुसार मीठ आणि लाल तिखट
१ चमचा शेंगदाण्याचा जाडाभरडा कूट
कृती
भरीताचे वांगे स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर ते पुसून कोरडे करून घ्या. यानंतर वांग्याला बाहेरच्या बाजुने सगळीकडून तेल लावून घ्या आणि गॅसवर ठेवून वांगे खरपूस भाजून घ्या. भाजून घेतलेली वांगी थंड होऊ द्या आणि त्यानंतर त्याचा बाहेरचा काळपट झालेला भाग काढून टाका.
तोपर्यंत लसूण आणि मिरच्या थोड्या ठेचून घ्या. गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यात तेल घालून फोडणी करा आणि ठेचून घेतलेला लसूण, मिरच्या परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये भाजून घेतलेलं वांगं आणि बारीक चिरलेला कांदा घाला. चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालून एक वाफ येऊ द्या. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की खरपूस खमंग भरीत तयार.
