भाजणीचे थालीपीठ महाराष्ट्रात घरोघरी केले जाते. फार लोकप्रिय असा नाश्त्याचा प्रकार आहे. (Traditional Marathi Recipe: How can you forget grandma's hand-made mokal bhajani? Try this authentic traditional instant recipe, Maharashtra recipe)त्याच थालीपिठाच्या भाजणीचा आणखी एक पदार्थ करता येतो. तो म्हणजे मोकळ भाजणी. करायला एकदम सोपी आहे. चवीला फारच भारी. थालीपिठाची भाजणी तर घरी असतेच. त्यात धान्ये, डाळी, मसाले असतात. त्याची मोकळ भाजणी कशी कराल ते पाहा.
साहित्यभाजणीचे पीठ, कांदा, पाणी, तेल, कडीपत्ता, मोहरी, हिंग, कोथिंबीर, लोणी ,हिरवी मिरची, लाल तिखट
कृती१. कांदा छान बारीक चिरायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. ताजी कोथिंबीर आणायची आणि निवडून घ्यायची. निवडून झाल्यावर मस्त बारीक चिरायची. भाजणीचे पीठ एका मोठ्या वाडग्यात घ्यायचे आणि त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. कोथिंबीर घालायची आणि सगळं कालवून घ्यायचं. त्यात चमचाभर मीठ घालायचे. लाल तिखट घालायचे आणि चमचाभर हळदही घालायची. सगळे पदार्थ छान मिक्स करायचे. मग त्यात पाणी घालायचे.
२. थालीपीठासाठी भिजवता त्यापेक्षा पातळ पीठ भिजवायचे. व्यवस्थित पीठ मळायचे आणि पाण्याचे प्रमाण तपासून बघायचे. पीठ तयार झाल्यावर बाजूला ठेवा. मऊ करायची असेल तर पाणी जरा कमी घाला कुरकुरीत करायची असेल तर पाणी जरा जास्त घाला.
३. एका खोलगट पॅनमध्ये तेल घ्यायचे. तेल तापल्यावर त्यात मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यात हिंग घालायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. नाही घातले तरी चालेल. जास्त तिखट आवडत नाही पचत नाही तर फक्त लाल तिखट घाला. काही जण कांदा फोडणीत परततात. तुम्हाला त्या पद्धतीनेही आवडेल. फोडणी परतून झाल्यावर त्यात तयार पीठ घालायचे आणि व्यवस्थित परतायचे. फोडणीसाठी तेल जरा जास्त वापरा. म्हणजे भाजणी मोकळी होईल.
४. त्यावर थोडे पाणी घाला आणि झाकून ठेवा. एक वाफ काढा. भाजणी शिजली की गॅस बंद करा आणि गरमागरम भाजणी ताटात घ्या. त्यावर मस्त लोणी घाला. गरम भाजीवर लोणी छान वितळते. सोपी रेसिपी आहे नक्की करुन पाहा. खुप छान लागते.