कितीही मस्त पदार्थ विकत आणले तरी घरचे ते घरचेच. आजकाल सगळ्या प्रकारचे पदार्थ विकत मिळतात. अगदी पीठांपासून खाण्यासाठी तयार पदार्थांपर्यंत सगळं मिळतं. भारतीय स्वयंपाकघरांत अनेक प्रकारची पीठ असतात. भाकरी, पोळी, आंबोळी, थालीपीठ आणि इतरही अनेक पीठं असतात. (Traditional Maharashtrian Food: Thalipeeth Flour recipe, must try)थालीपीठाची भाजणी फारच मस्त आणि खमंग असते. तिचा वासही एकदम छान असतो. बाजारात अनेक प्रकारच्या भाजणी मिळतात, मात्र घरी केलेली भाजणी जेवढी छान लागते तेवढी विकतची लागणार नाही. त्यामुळे घरीच पीठ तयार करा आणि दळून आणा. अगदी सोपे आहे. पाहा मस्त भाजणी तयार करण्यासाठीचे प्रमाण.
साहित्य
अर्धा किलो लाल चणे
अर्धा किलो काळे उडीद
पाव किलो हिरवे मूग
एक वाटी मटकी
एक वाटी धणे
अर्धी वाटी जिरे
मेथी दोन चमचे
अर्धा किलो ज्वारी
अर्धा किलो तांदूळ
अर्धा किलो गहू
कृती
१. अर्धा किलो लाल चणे भाजून घ्यायचे. छान खमंग भाजायचे. सगळे पदार्थ वेगळे भाजायचे म्हणजे भाजणी जास्त खमंग होईल. एकत्रही भाजतात, पण वेगळी परतल्यावर चव जास्त छान लागते. थालीपीठ जास्त कुरकुरीत होते. तसेच आतून मऊ होते. अर्धा किलो तांदूळ भाजायचे. तसेच अर्धा किलो ज्वारी भाजायची आणि अर्धा किलो गहूही भाजायचे. तांदूळ, गहू आणि ज्वारी समप्रमाणात घ्यायचे.
२. अर्धा किलो काळे उडीद म्हणजेच अख्खे उडीद भाजायचे. त्या नंतर पाव किलो हिरवे मूग भाजायचे. कुरकुरीत आणि जरा गडद रंगाचे झाले की काढून घ्यायचे. वाटीभर मटकी घ्यायची आणि छान भाजायची. तसेच अर्धी वाटी जिरे आणि वाटीभर धणे भाजायचे. धणे जिरे एकत्र भाजून चालते.
३. सगळे पदार्थ एकत्र करायचे. त्यात दोन चमचे मेथीचे दाणे घालायचे. मेथीचे दाणेही भाजून घेतले जातात. मात्र मेथी दाणे भाजल्यावर जरा कडू लागतात. त्यामुळे न भाजतातच पीठासाठीच्या मिश्रणात घालायचे. सगळे पदार्थ सरसरीत दळून आणायचे. अगदी सोपी आणि साधी भाजणी रेसिपी आहे. अनेक जण बाजरी, पोहे, मसाले असे विविध पदार्थही घेतात. या पद्धतीने एकदा भाजणीचं पीठ करुन पाहा, नक्की आवडेल.