बऱ्याचदा असं होतं की घरात कोणतीच भाजी नसते. अशावेळी स्वयंपाकात काय करावं हा प्रश्न पडतोच. किंवा काही वेळेला असंही होतं की त्याच त्या चवीच्या आपल्या नेहमीच्या भाज्या खाऊनही खूप कंटाळा आलेला असतो. चवीत काहीतरी बदल हवा असतो. पण चवबदल होण्यासाठी खूप काही वाटून घाटून मसालेदार भाज्या करण्याची इच्छा नसते. अशावेळी टोमॅटोचा ठेचा ही रेसिपी तुम्हाला नक्कीच खूप उपयोगी येऊ शकते (tomato thecha recipe). ही रेसिपी अगदी झटपट होते (how to make tomato thecha?). शिवाय चवीला अतिशय खमंग होतं. तुम्ही हा टाेमॅटो ठेचा भाजीसारखाही खाऊ शकता (tomato chutney recipe) किंवा मग जेवणात तोंडी लावायलाही घेऊ शकता.(instant tomato chutney in just 5 minutes)
टोमॅटो ठेचा करण्याची रेसिपी
साहित्य
२ मध्यम आकाराचे लालबुंद टोमॅटो
७ ते ८ हिरव्या मिरच्या
७ ते ८ लसूण पाकळ्या
१ टीस्पून जीरे
अर्धा टीस्पून तेल
चवीनुसार मीठ
कृती
ही रेसिपी करण्यासाठी गॅस शेगडीवर तवा गरम करायला ठेवा.
तवा गरम झाल्यानंतर त्यावर तेल घाला. तेल गरम होईपर्यंत टोमॅटो अर्धे अर्धे कापून घ्या आणि मिरच्यांना उभे छेद द्या.
यानंतर गरम झालेल्या तेलामध्ये टोमॅटो, मिरच्या, लसूण घाला आणि त्यावर झाकण ठेवून द्या. अधून मधून तव्यावरचं झाकण काढून टोमॅटो आणि मिरच्यांची साईड बदला आणि ते खमंग वाफवून घ्या. गॅस बंद करून ते थोडे थंड होऊ द्या. त्याचवेळी त्यामध्ये थोडे जिरे घालून ठेवा.
आता मॅशर किंवा रवी घेऊन टोमॅटो, मिरच्या, लसूण, जिरे ठेचून चांगले एकजीव करून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घातले की झणझणीत टोमॅटो ठेचा झाला तयार.