जगभरात सफरचंदांचे अनेक प्रकार आढळतात. लाल, हिरवे, पिवळे सफरचंद आपण नेहमी पाहतो. मात्र कधी काळ्या रंगाचे सफरचंद पाहीले आहे का? काळे सफरचंद फक्त दंतकथांमध्ये नसते तर हा सफरचंदाचा खरा प्रकार आहे.(This black apple is as expensive as an Apple phone, you will be surprised to hear the price of a single piece) दिसायला गडद काळसर-जांभळ्या रंगाचे हे सफरचंद अत्यंत दुर्मिळ आणि महागड्या फळांपैकी एक मानले जाते. त्याच्या अनोख्या रंगामुळे आणि मर्यादित उपलब्धतेमुळे ते जगभरात प्रसिद्ध आहे.
या फळाला ब्लॅक डायमंड अॅपल असे म्हटले जाते. हे मूळचे चीनमधील तिबेटच्या निंगची (Nyingchi) प्रदेशातील आहे. हा भाग समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० मीटर उंचीवर असून येथे सूर्यप्रकाशातील अतिनील (UV) किरणे अधिक प्रमाणात असतात. याच विशिष्ट हवामानामुळे या सफरचंदाच्या सालीवर नैसर्गिकरित्या गडद जांभळा आणि काळसर रंग येतो. या फळाचा आतला गर मात्र सामान्य सफरचंदासारखाच पांढरा परंतू किंचित गुलाबी असतो.
हे सफरचंद रेड डिलीशियस या प्रकाराचाच एक दुर्मिळ उपप्रकार मानले जाते. मात्र त्याची लागवड करणे खूप कठीण आहे. झाड लावल्यानंतर फळ येण्यासाठी साधारणपणे ५ ते ८ वर्षे लागतात. उत्पादन कमी, हवामानावर अवलंबून आणि लागवडीचा कालावधी लांबलचक असल्यामुळेच हे फळ इतके महाग आणि दुर्मिळ आहे.
भारतामध्ये ब्लॅक डायमंड अॅपल नियमित बाजारात सहज उपलब्ध नसते. काही वेळा एक्सोटिक फळ विकणाऱ्या खास दुकानांमध्ये ते मिळू शकते. उपलब्धतेनुसार भारतात या फळाची किंमत साधारणतः प्रत्येक सफरचंदासाठी ५०० ते ७०० रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते. त्यामुळे हे फळ रोजच्या वापरापेक्षा लक्झरी किंवा खास अनुभवासाठी घेतले जाते.
पोषणमूल्यांच्या दृष्टीने ब्लॅक डायमंड अॅपल हे सामान्य सफरचंदासारखेच आरोग्यदायी आहे. यात चांगल्या प्रमाणात फायबर असते, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. तसेच व्हिटॅमिन सी, काही खनिजे आणि नैसर्गिक अँटी ऑक्सिडंट्स यांचा समावेश असतो. या फळातील गडद रंगासाठी कारणीभूत असलेले अँथोसायनिन्स हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स मानले जातात, जे शरीरातील फ्री-रॅडिकल्सचा प्रभाव कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, त्वचेचे आरोग्य टिकवणे आणि शरीर तंदुरुस्त ठेवणे यासाठी हे फळ उपयुक्त ठरू शकते.
चवीच्या बाबतीत ब्लॅक डायमंड अॅपल गोडसर, किंचित आंबट आणि छान असते. हे सफरचंद प्रामुख्याने कच्चे खाल्ले जाते. सलाड, फ्रूट प्लेट किंवा सजावटीसाठीही याचा वापर केला जातो. त्याचा अनोखा रंग पाहता अनेक ठिकाणी हे फळ पाहुण्यांसमोर खास आकर्षण म्हणूनही मांडले जाते.
एकूणच, ब्लॅक डायमंड अॅपल हे फळ पोषणासाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते दुर्मिळता, नैसर्गिक सौंदर्य आणि वेगळेपणासाठी ओळखले जाते. भारतात ते सहज मिळत नसले तरी, त्याबद्दलची उत्सुकता आणि आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाइन हे फळ अनेक जण मागवतात.
