नारळाचे पाणी आरोग्यासाठी फार चांगले असते आणि चवीलाही छान असते. (tender coconut traditional dish-bhaji-curry-sabzi tasty recipe and full of nutrition-Maharashtrian marathi goan food)नारळ तसेच शहाळे घरोघरी खाल्ले जातात. मात्र कधी शहाळ्याची भाजी खाल्ली आहे का ? मस्त मलाईदार अशीही भाजी एकदा नक्की खाऊन पाहा. करायला अगदी सोपी आहे.
साहित्य शहाळे, मोहरी, तेल, लाल तिखट, हळद, कोथिंबीर, लाल मिरची, चिंच, मीठ, नारळ
कृती१. शहाळे घ्यायचे. नारळ घेतला तरी चालेल. मात्र शहाळे जास्त गोड असते आणि ही भाजी शक्यतो शहाळ्याचीच केली जाते. नारळ तेवढा चविष्ट लागणार नाही जेवढे शहाळे लागेल. शहाळे फोडायचे. त्याचे थोडे पाणी ठेवायचे. शहाळ्याची मलाई काढून घ्यायची. तिचे लांब पातळ असे काप करायचे. जास्त पातळ नको. एका वाटीत थोडी चिंच भिजत घालायची. गरम पाण्यात भिजवायची. चिंच काही मिनिटांनंतर अगदी मऊ होईल. मग कुसकरायची आणि पाणी गाळून घ्यायचे. पाणी आणि चोथा वेगळा करायचा.
२. एक नारळही फोडायचा. फोडलेल्या नारळाचे तुकडे करायचे. एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. त्यात नारळ पाणी आणि थोडे साधे पाणी घालायचे. जेवढा नारळ तेवढेच पाणी असे प्रमाण घेऊन मिक्सरमधून नारळ वाटून घ्यायचा. व्यवस्थित वाटायचा. नंतर एका पातेल्यावर पातळ कॉटनचा फडका ठेवायचा. त्यावर नारळाचे मिश्रण ओतायचे आणि नीट पिळून घ्यायचे. नारळाचे दूध तयार होईल.
३. एका कढईमध्ये चमचाभर तेल घ्यायचे. तेल जरा गरम झाल्यावर त्यात मोहरी घालायची. मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग घालायचे. हिंग जरा परतायचे मग त्यात लाल तिखट घालायचे आणि हळदही घालायची. मसाले करपण्याआधी त्यात शहाळ्याचे तुकडे घालायचे आणि छान परतायचे. त्याला शिजायला वेळ लागत नाही. पाच मिनिटे झाकून ठेवायचे आणि वाफ काढून घ्यायची.
४. मग भाजीत चवी पुरते मीठ घालायचे. तसेच तयार करुन ठेवलेले चिंचेचे पाणी घालायचे. नारळाचे दूध घालायचे. जास्त नाही घट्ट पणा येईल एवढेच घालायचे. भाजी छान आटू द्यायची. जरा आटायला लागल्यावर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. भाजी ढवळायची आणि गॅस बंद करायचा.