Join us

रोज तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळले असाल तर ट्राय करा एवोकाडो पनीर सॅंडविच, पाहा रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 12:29 IST

Healthy Avocado Paneer Sandwich Recipe: रोजचा तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळले असाल तर आम्ही आपल्यासाठी एक टेस्टी, चटकदार आणि खूपच हेल्दी असा पर्याय घेऊन आलो आहोत.

Healthy Avocado Paneer Sandwich Recipe: जास्तीत जास्त लोकांना हा अनुभव असेल की, दिवसाची सुरूवात जर चांगली झाली तर पूर्ण दिवसही फ्रेश, उत्साही जातो. बरं यात सगळ्यात महत्वाची भूमिका असते ती म्हणजे सकाळच्या हेल्दी आणि टेस्टी नाश्त्याची. रोज सकाळी हेल्दी नाश्ता केला तर दिवसभर एनर्जी मिळते आणि काम करण्याची शक्तीही वाढते. 

सकाळचा नाश्ता म्हटला तर जास्तीत जास्त लोकांच्या डोळ्यांसमोर पोहे, उपमा, चणे, ऑम्लेट ब्रेड, मिसळ, इडली, वडा सांबार असे पदार्थ येतात. पण जर आपण हे रोजचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळले असाल तर आम्ही आपल्यासाठी एक टेस्टी, चटकदार आणि खूपच हेल्दी असा पर्याय घेऊन आलो आहोत. याची टेस्ट तर कमाल असेलच, सोबतच आपल्याला दिवसभर एनर्जी मिळेल. हा पर्याय म्हणजे 'ॲव्होकाडो पनीर सॅंडविच'. महत्वाची बाब म्हणजे हे सॅंडविच बनवणं सुद्धा फार सोपं आहे. चला तर पाहुयात काय लागेल साहित्य आणि कसं बनवाल.

साहित्य

ब्रेड स्लाइस – २ (ब्राउन, मल्टिग्रेन किंवा आवडीची कोणतीही)

पिकलेलं ॲव्होकॅडो – अर्धं

पनीर – ५० ग्रॅम (किसलेलं किंवा पातळ स्लाइस केलेलं)

लिंबाचा रस – अर्धा चमचा

बारीक चिरलेली कोथिंबीर – १ चमचा

बारीक चिरलेली हिरवी मिरची – १

मीठ – चवीनुसार

काळी मिरी पावडर – ¼ चमचा

लोणी किंवा ऑलिव्ह ऑइल – १ ते २ चमचे

कसं बनवाल?

सगळ्यात आधी तर ॲव्होकॅडो सोलून त्याचा गर एका बाऊलमध्ये काढा. त्यात लिंबाचा रस, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ आणि काळी मिरी पूड घाला. या गोष्टी चमच्यानं चांगल्या बारीक करा आणि पेस्ट बनवा.

त्यानंतर ब्रेडची एक स्लाइस घ्या आणि त्यावर तयार केलेली ॲव्होकॅडो पेस्ट समान पसरवा. त्यावर किसलेलं पनीर किंवा पनीरचे स्लाइस ठेवा. वर दुसरी ब्रेड स्लाइस ठेवून सॅंडविच बंद करा.

तवा किंवा ग्रिलर गरम करून त्यावर थोडं लोणी किंवा ऑलिव्ह ऑइल लावा. सॅंडविच तव्यावर ठेवा आणि मध्यम आचेवर शेकून घ्या. एका बाजूने सोनेरी व खमंग झाल्यावर थोडं लोणी लावून पलटवा. दोन्ही बाजू कुरकुरीत आणि सोनेरी झाल्यावर गॅस बंद करा. आपले गरमागरम, चटकदार ॲव्होकॅडो पनीर सॅंडविच तयार आहे.

टॅग्स :अन्नआरोग्य