Join us

उन्हाळ्यात मठ्ठा नाही प्यायला तर काय मजा? आंबट-गोड मठ्ठा शरीर आणि मनालाही गारवा देतो, पाहा झटपट मस्त रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2023 12:07 IST

Tak Mattha Recipe Summer Special : उन्हामुळे तोंडाची चव गेली असेल तर ती आणण्यासही मठ्ठा पिणे फायदेशीर ठरते

उन्हाळ्याच्या दिवसांत सतत काहीतरी गारेगार प्यावं असं आपल्याला वाटतं. मग आपण आहारात सोलकढी, ताक, सरबतं, उसाचा रस, ज्यूस अशा काही ना काही गोष्टींचा समावेश करतो. यामुळे तहानही भागली जाते आणि उन्हामुळे थकवा आला असेल तर तो कमी होण्यास मदत होते.आहारात ताक आणि दही घेणं हे तर नेहमीचंच. पण याच ताकापासून केला जाणारा आंबट-गोड मठ्ठा जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. तसंच उन्हामुळे तोंडाची चव गेली असेल तर ती आणण्यासही मठ्ठा पिणे फायदेशीर ठरते (Tak Mattha Recipe Summer Special).     

ताकामुळे पित्तशमन होते, अपचनाच्या तक्रारी दूर होतात. तसेच ताकात विटामिन B 12, कैल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस यांसारखे गुणधर्म असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ताक प्यायल्याने उन्हामुळे येणारी मरगळ, थकवा निघून जाण्यास मदत होते, इतकेच नाही तर ताक प्यायल्याने उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या लघवीशी निगडित तक्रारी दूर होण्यास मदत होते. ताकाबरोबरच त्यापासूनच तयार केला जाणार मठ्ठा जास्त चविष्ट असतो. मसालेभात किंवा जिलेबी असेल तर त्यासोबत आवर्जून मठ्ठा केला जातो. पाहूयात हा मठ्ठा करण्याची सोपी रेसिपी...

(Image : Google)

साहित्य -

१. ताक - ४ वाटी 

२. साखर - १ चमचा 

३. हिरवी मिरची - १ 

४. आलं -  १ इंचाचा तुकडा 

५. लसूण - ५ पाकळ्या

६. काळं मीठ - अर्धा चमचा 

७. जीरे - १ चमचा 

८. कोथिंबीर - चिरलेली अर्धी वाटी 

कृती -

१. आलं, मिरची, लसूण आणि जीरे एकत्र करुन मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करुन घ्यावी.

२. ही पेस्ट मठ्ठ्यामध्ये घालावी. 

३. त्यामध्ये मीठ, साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे मिश्रण एकजीव करावे.

४. गारेगार चविष्ट मठ्ठा भर दुपारच्या उन्हात प्यायला अतिशय चांगला लागतो. 

५. आवडत असेल तर तुम्ही या मठ्ठ्यामध्ये खारी बुंदीही घालू शकता. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.समर स्पेशल