घरच्या जेवणात 'डाळ' हा नेहमीचा पदार्थ असला तरी हॉटेलमध्ये मिळणारी चमचमीत, चटपटीत तडका डाळ खाल्ली की तिची चव काही औरच लागते. हॉटेलमध्ये गेल्यावर आपण कितीही पदार्थ मागवले तरी, जिरा राईससोबत मिळणाऱ्या त्या चमचमीत 'डाळ तडका'ची चव अप्रतिमच लागते. वरून दिलेल्या त्या कडकडीत फोडणीचा सुवास आणि डाळीचा तो घट्टपणा यामुळे साध्या जेवणाची लज्जत वाढते. कधीकधी भाजी खायचा कंटाळा येतो आणि काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते, अशा वेळी 'डाळ तडका' हा सर्वात उत्तम पर्याय असतो. डाळीचे पौष्टिक गुणधर्म आणि वरून दिलेल्या लसूण-मिरचीच्या तडक्याची जादू, कोणत्याही साध्या जेवणाला शाही जेवण बनवू शकते( How To Make Hotel Style Tadka Dal At Home)
नेहमीच्याच डाळीला दिलेला खमंग तडका, मसाल्यांचा सुगंध आणि डाळीचे क्रीमी घट्टसर टेक्स्चर यामुळे साधी डाळही खास बनते. बरेचदा घरी डाळ करूनही “हॉटेलसारखी चव येत नाही” अशी तक्रार ऐकायला मिळते. पण काही सोप्या टिप्स आणि योग्य पद्धतीने तडका दिल्यास घरच्याघरीही अगदी रेस्टॉरंट स्टाईल तडका डाळ तयार करता येते. हॉटेलसारखी परफेक्ट, चटपटीत आणि चव जिभेवर रेंगाळणारी 'तडका डाळ' तयार करण्याची सोपी आणि अचूक रेसिपी. अगदी कमी साहित्यात आणि फारशी मेहेनत (Tadka Dal Recipe) न घेता हॉटेलच्या चवीलाही मागे टाकेल अशा चवीची तडका डाळ घरच्याघरीच तयार करण्याची इन्स्टंट रेसिपी...
साहित्य :-
१. तूर डाळ - १/२ कप
२. मूग डाळ - १/२ कप
३. पाणी - गरजेनुसार
४. मीठ - चवीनुसार
५. हळद - १/२ टेबलस्पून
६. तेल / साजूक तूप - १ टेबलस्पून
७. जिरे - १/२ टेबलस्पून
८. मोहरी - १/२ टेबलस्पून
९. हिंग - चिमूटभर
१०. हिरव्या मिरच्या - १ टेबलस्पून (बारीक चिरलेल्या)
११. आलं - लसूण पेस्ट - १/२ टेबलस्पून
१२. कडीपत्ता - २ ते ३ पाने
१३. टोमॅटो - १/२ कप
१४. लाल तिखट मसाला - १/२ टेबलस्पून
१५. धणेपूड - १/२ टेबलस्पून
१६. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
१७. लाल सुक्या मिरच्या - २ ते ३
कृती :-
१. सगळ्यात आधी तूर आणि मूग डाळ पाण्याने ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्यावी.
२. प्रेशर कुकरमध्ये भिजवलेली तूर आणि मूग डाळ घालावी त्यात गरजेनुसार पाणी, चवीनुसार मीठ, हळद, साजूक तूप किंवा तेल घालावे. झाकण लावून २ ते ३ शिट्ट्या काढून डाळ व्यवस्थित शिजवून घ्यावी.
३. एका कढईत तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, हिंग, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं - लसूण पेस्ट घालावी. त्यानंतर यात कडीपत्ता, बारीक चिरलेला टोमॅटो, हळद, धणेपूड, लाल तिखट मसाला व चवीनुसार मीठ घालावे. खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी.
४. मग या खमंग फोडणीत शिजवून घेतलेली डाळ हलकेच मॅश करून घालावी. डाळीला मंद आचेवर व्यवस्थित शिजवून घ्यावे, एक उकळी येऊ द्यावी.
५.आता एका दुसऱ्या भांड्यात तेल घेऊन त्यात थोडी मोहरी, जिरे, लाल तिखट, हिंग, सुक्या लाल मिरच्या घालूंन खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी. ही गरमागरम फोडणी तयार डाळीत ओतावी. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घ्यावी.
घरच्याघरीच अगदी हॉटेलसारखी खमंग चवीची तडका डाळ खाण्यासाठी तयार आहे. वाफाळता भात किंवा चपातीसोबत देखील आपण ही तडका डाळ चवीने खाऊ शकतो.
