Join us

Summer Special : उन्हामुळे तोंडाला चव नसेल तर करा कैरीची आंबट गोड डाळ, पौष्टीक चटकदार रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 10:42 IST

Summer Special : उत्तम कॉम्बिनेशन असलेली ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही कैरीची डाळ कशी करायची पाहूया...

ठळक मुद्देघरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही कैरीची डाळ कशी करायची पाहूयाउन्हाळ्याच्या दिवसांत पौष्टीक आणि तरीही चटकदार डाळ करुन तर पाहा

उन्हामुळे आपल्याला काहीच खायला नको वाटते. तळपत्या सूर्यामुळे सतत पाणी नाहीतर गार काहीतरी प्यावेसे वाटते. या काळात आपल्याला जेवण कमी जात असल्याने आणि उन्हामुळे अंगातील त्राणही अनेकदा कमी झाल्यासारखे वाटते. कदाचित त्यासाठीच या काळात निसर्ग आपल्याला आंबा, कैरी, कलिंगड यांसारख्या गोष्टी देऊन आपली काळजी घेत असावा. कैरीचे नुसते नाव काढले तरी अनेकदा आपल्या तोंडाला पाणी सुटते. पाडव्यानंतर बाजारात हिरव्यागार कैऱ्या दिसायला लागतात. या कैरीचे आंबट गोड पदार्थ म्हणजे जणू पर्वणीच. कैरीचे ताजे लोणचे, कैरीचे पन्हे अगदी काही नाही तर जेवताना तोंडी लावायला तिखट मीठ लावून कैरीच्या फोडी घेतल्या तरी जेवणाला एक वेगळी चव येते. 

(Image : Google)

चैत्र महिना सुरू झाल्यावर घरोघरी चैत्र गौर थाटामाटात विराजमान होते. या चैत्रगौरीचे हळदीकुंकू म्हणजे जणू एक सोहळाच. चैत्रगौरीसाठी फराळाचे पदार्थ केले जात असले तरी आवर्जून केले जाणारे खास पदार्थ म्हणजे आंब्याची डाळ किंवा कैरीची डाळ आणि पन्हे. आंबट गोड डाळीचे नाव ऐकले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. करायला अतिशय सोपी आणि तरीही तोंडाला चव आणणारी ही डाळ तब्येतीसाठीही पौष्टीक असते. हरभऱ्याच्या डाळीत असणारे प्रोटीन आणि इतर घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. कैरीमुळे त्याला येणारा स्वाद हे अतिशय उत्तम कॉम्बिनेशन असलेली ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही कैरीची डाळ कशी करायची पाहूया...

साहित्य -

१. हरभरा डाळ - २ वाट्या २. कैरी - एक मध्यम आकाराची३. साखर - २ चमचे ४. मीठ - १ चमचा५. तेल - २ चमचे६. जीरे - १ चमचा ७. हिंग - पाव चमचा८. हळद - अर्धा चमचा ९. कोथिंबीर - अर्धी वाटी १०. मिरची - २ ते ३ 

(Image : Google)

कृती -

१. आदल्या दिवशी रात्री हरभरा डाळ पाण्यात भिजवून ठेवायची. २. दुसऱ्या दिवशी ही डाळ अर्धवट मिक्सरमधून वाटून घ्यायची. यामध्येच वाटताना मिरची घालायची.३. वाटलेली डाळ एका मोठ्या भांड्यात काढून त्यामध्ये कैरी किसून घालायची.४. मीठ, साखर आवडीनुसार घालायचे.  ५. तेलामध्ये जीरे, हिंग आणि हळद घालून फोडणी करायची. ही तडतडणारी फोडी गरम असतानाच डाळीवर घालायची.६. हे सगळे एकजीव करुन त्यावर भरपूर कोथिंबीर घाला आणि ही कैरी डाळ खायला घ्या. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.समर स्पेशल