Join us

Summer Special : काकडीचं गारेगार सरबत करा फक्त 5 मिनिटात, उन्हाळ्यात काकडी खाण्याचे ४ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 16:55 IST

Summer Special : काकडीच्या फोडी किंवा कोशिंबीर याशिवाय काकडीचे सरबत तुम्ही कधी ट्राय केलंय? पाहूया सरबताची रेसिपी

ठळक मुद्देकाकडीचे गारेगार सरबत भर उन्हात अतिशय उपयुक्त ठरतेनेहमी तीच तीच सरबते पिण्यापेक्षा करा हा आगळावेगळा प्रयोग

काकडी म्हणजे उन्हाळ्यात आवर्जून खाल्ले जाणारे सलाड. पाण्याचा अंश सर्वाधिक असलेली काकडी म्हणजे भर उन्हात शरीराला थंडावा देणारी गोष्ट. गारेगार गोड काकडी मीठ आणि थोडंस तिखट लावून कराकरा खायला जी मजा येते ती इतर कशातच नाही. कार्बोहायड्रेटस आणि कॅलरीजचे कमी प्रमाण यामुळे काकडी खाल्ल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते. काकडीमध्ये असणारे पोटॅशियम, फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, व्हीटॅमिन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मँगनीज हे घटक चांगल्या प्रमाणात असतात. (Summer Special) त्यामुळे काकडी खाणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते. काकडीच्या फोडी खाणे किंवा कोशिंबीर याशिवाय काकडीचे सरबत तुम्ही कधी ट्राय केलंय? याच सरबताची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. 

(Image : Google)

फायदे 

१. अन्नपचनासाठी उपयुक्त 

अनेकदा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अन्नपचनाच्या तक्रारी असतात. अशावेळी नियमित काकडी खाल्ल्यास पचनाची क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. काकडीमध्ये ९० टक्क्यांहून अधिक प्रमाण पाण्याचे असल्याने शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकण्यासाठी काकडी उपयुक्त ठरते. 

२. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत 

काकडीतील काही घटकांमुळे शरीरात इन्शुलिन तयार होते. इन्शुलिनमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांना मधुमेह आहे त्यांना नियमित काकडी खायला हवी. 

३. रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत 

हल्ली उच्च रक्तदाब ही अतिशय सामान्य समस्या झाली आहे. कमी वयात उच्च रक्तदाबाचा त्रास होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काकडीमध्ये असणारे फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम या घटकांमुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

४. त्वचेसाठी फायदेशीर  

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीर हायड्रेट राहण्यासाठी ज्याप्रमाणे काकडी खाणे फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे त्वचा आणि केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी काकडी उपयुक्त असते. काकडीचे पाणी चेहऱ्यावर लावणे, डोळ्यांवर काकडीच्या चकत्या ठेवणे. यामुळे त्वचेला गार तर वाटतेच, पण त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. 

काकडीचे सरबत

साहित्य - 

१. काकडी - १ ते २ २. पुदिना - ५ ते ६ पाने ३. आलं - १ इंच४. लिंबाचा रस - १ चमचा५. काळं मीठ - अर्धा चमचा ६. मध - अर्धा चमचा७. तुळशीचं बी - २ चमचे८. बर्फाचे खडे - ३ ते ४ ९. पाणी - अर्धा ग्लास 

कृती - 

१. तुळशीच्या बिया सोडून सर्व घटक मिक्सरमध्ये एकत्र करावेत व त्याचा ज्यूस तयार करावा.२. तुळशीच्या बिया पाण्यामध्ये भिजवून ठेवाव्यात. ज्यूस ओतताना सर्वात खाली तुळशीच्या बिया घालाव्यात.३. गारेगार सरबत भर उन्हात अतिशय उपयुक्त ठरते.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.समर स्पेशल