उन्हाळ्याच्या दिवसांत काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते, पण तूप-साखर किंवा पाक करण्याचा कंटाळा येतो. अशा वेळी शरीराला थंडावा देणारे आणि झटपट होणारे 'नो कुकिंग' (No-Cooking) लाडू हा उत्तम पर्याय आहे. विशेष म्हणजे हे लाडू करण्यासाठी तुम्हाला गॅस सुरु करण्याचीही गरज नाही! चला तर मग, जाणून घेऊया प्रोटीन आणि लोह भरपूर प्रमाणात असलेले हे 'उन्हाळा स्पेशल' आरोग्यदायी लाडू.
साहित्य :
फुटाणे: १ वाटी (साल काढलेले)
खजूर: १ वाटी (बिया काढलेले, मऊ असावेत)
भिजवलेले बदाम: पाव वाटी (साले काढून)
बिया (Seeds): भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बिया मिळून ४ चमचे
खसखस: २ चमचे
वेलदोडे: ४ (पूड करून)
बडीशेप: १ चमचा
डेसिकेटेड कोकोनट (सुके खोबरे कीस): अर्धा वाटी
कृती :
१. फुटण्याची पूड: सर्वात आधी मिक्सरमध्ये फुटाणे घालून त्याची बारीक पूड करून घ्या आणि एका मोठ्या भांड्यात काढून घ्या.
२. पेस्ट तयार करणे: आता त्याच मिक्सरच्या भांड्यात मऊ खजूर, भिजवलेले बदाम, भोपळ्याच्या व सूर्यफुलाच्या बिया, बडीशेप आणि वेलदोडे घालून त्याचे थोडे जाडसर वाटण (Paste) तयार करा.
३. मिश्रण एकजीव करणे: तयार झालेली खजूर-बदामाची पेस्ट फुटण्याच्या पुडीत घाला. त्यात अर्धा वाटी डेसिकेटेड कोकोनट आणि खसखस घालून सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित एकजीव करा.
४. लाडू वळणे: खजुराच्या नैसर्गिक चिकटपणामुळे या मिश्रणाला छान बांधणी येते. आता या मिश्रणाचे मध्यम आकाराचे लाडू वळून घ्या. जर मिश्रण थोडे कोरडे वाटले, तर १-२ चमचे दूध किंवा मध वापरू शकता, पण साधारणपणे खजुरामुळे त्याची गरज भासत नाही किंवा २ चमचे तूपही वापरता येईल.
या लाडूंचे आरोग्यदायी फायदे:
नैसर्गिक ऊर्जा: यात साखर किंवा गूळ नसल्यामुळे खजुराची नैसर्गिक गोडी मिळते, जी रक्तातील साखर अचानक वाढवत नाही आणि तात्काळ ऊर्जा देते.
पचनासाठी उत्तम: बडीशेप आणि वेलदोडे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतात आणि पचनशक्ती सुधारतात.
प्रोटीनचा खजिना: फुटाणे आणि बदामांमुळे यात भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते, जे मुलांच्या वाढीसाठी आणि स्नायूंच्या मजबुतीसाठी उत्तम आहे.
हाडांचे आरोग्य: खसखस आणि विविध बिया (Seeds) कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा उत्तम स्त्रोत आहेत, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
थंडावा देणारे: डेसिकेटेड कोकोनट आणि खसखस हे दोन्ही घटक उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हनजे सध्या गॅस महागल्यामुळे आणि उन्हाळा वाढल्यामुळे हे झटपट होणारे लाडू कमी कष्टात आणि कमी साहित्यात तयार होतात आणि मुलांना, मोठ्यांना मधल्या वेळच्या भुकेसाठी उत्तम पर्याय ठरतात. पाहा व्हिडीओ -
