Spinach Soup Recipe: हिवाळ्यात जास्तीत जास्त लोक गरमागरम गोष्टी खाण्याच्या आणि पिण्याच्या प्रयत्नात असतात. गरम चहा-कॉफी सोबतच बरेच लोक वेगवेगळ्या भाज्यांचे सूप पिणंही पसंत करतात. गरमागरम आणि हेल्दी सूप पिण्याची मजाच काही और असते. जर तुम्हाला टेस्टसोबत आरोग्यावरही लक्ष द्यायचे असेल, तर पालकाचे सूप बेस्ट पर्याय आहे. महत्वाची बाब म्हणजे हे सूप बनवणं देखील खूप सोपं आहे. चला तर पाहुयात पालकाच्या सूपाची रेसिपी.
काय लागेल साहित्य?
पालकाचं सूप बनवण्यासाठी तुम्हाला 2 कप धुतलेला आणि चिरलेला पालक, एक छोटा बारीक चिरलेला कांदा, 4 चिरलेल्या लसूण पाकळ्या, एक छोटा किसलेला आल्याचा तुकडा, एक छोटा चिरलेला टोमॅटो, एक चमचा तेल, मीठ, अर्धा चमचा काळी मिरी पूड, एक चमचा लिंबूरस आणि 2 कप पाणी लागेल.
पालकाचे सूप कसे बनवावे
आधी पॅनमध्ये पाणी गरम करा. हे पाणी उकळू लागल्यावर त्यात पालकाची पाने टाका आणि 2–4 मिनिटे उकडा. त्यानंतर एका भांड्यात थंड पाणी घ्या आणि उकडलेली पालकाची पाने त्यात टाका. काही वेळाने ही पाने मिक्सरमध्ये घालून बारीक प्युरी करून घ्या.
अतिशय सोपी रेसिपी
आता एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात लसूण, आले आणि कांदा टाकून हलका सोनेरी रंग येईपर्यंत परता. मग या मिश्रणात टोमॅटो घालून 2–4 मिनिटे शिजवा. आता या मिक्समध्ये पालकाची प्युरी आणि पाणी घाला. चवीसाठी मीठ आणि काळी मिरी पावडर घालायला विसरू नका. हे सूप मध्यम आचेवर 5–8 मिनिटे उकळा.
हेल्दी आणि टेस्टी सूप
सूप नीट शिजल्यावर गॅस बंद करा. गरमागरम पालकाच्या सूपमध्ये लिंबूरस घालून सर्व्ह करा. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हे हेल्दी आणि स्वादिष्ट सूप खूप आवडेल. हे सूप प्यायल्याने शरीरात उब कायम राहते आणि पोषक घटकांनी भरलेले असल्यामुळे थकवा कमी करण्यासही मदत होते.
