जेवणाच्या ताटात कितीही पक्वान्नं असली, तरी जोपर्यंत डाव्या बाजूला चटपटीत शेंगदाण्याची चटणी नसते, तोपर्यंत जेवण अपूर्णच वाटतं. त्यातही जर ती चटणी 'सोलापुरी' पद्धतीची असेल, तर मग काय नेहमीपेक्षा चार घास जास्तच जेवण होतं...सोलापूर म्हटलं की डोळ्यांसमोर सर्वातआधी येते ती जिभेवर रेंगाळणारी तिथली झणझणीत, चमचमीत 'शेंगदाणा चटणी'...(solapuri shengdana chutney recipe)
आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या चटण्या अगदी सहज मिळतात, पण घरात खलबत्त्यात कुटलेल्या किंवा अस्सल ग्रामीण पद्धतीने बनवलेल्या सोलापुरी चटणीची सर कशालाच येत नाही. केवळ ४ ते ५ घरातील उपलब्ध साहित्यातच तयार होणारी ही चटणी टिकायलाही उत्तम आणि चवीला तर अप्रतिम...तिखट, खमंग आणि चटपटीत चव असलेली ही चटणी भाकरी, पोळी किंवा अगदी साध्या भातासोबतही अगदी झक्कास लागते. लाल मिरची, लसूण आणि खास मसाल्यांचा वापर करून बनवली जाणारी ही चटणी प्रत्येक घासाला झणझणीतपणा आणि चटपटीत स्वाद देते. सोलापूरची ओळख असलेली ही खमंग, चमचमीत (solapuri peanut chutney recipe) आणि लालभडक शेंगदाणा चटणी कशी तयार करायची याची खास पारंपरिक रेसिपी पाहूयात...
साहित्य :-
१. शेंगदाणे - १ कप
२. तेल - १ ते २ टेबलस्पून
३. जिरं - १ टेबलस्पून
४. लसूण पाकळ्या - १० ते १२ पाकळ्या
५. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून
६. मीठ - चवीनुसार
कृती :-
१. सगळ्यात आधी कच्चे शेंगदाणे एका पॅनमध्ये घालून ते व्यवस्थित मंद आचेवर खरपूस असे भाजून घ्यावेत.
२. शेंगदाणे भाजून घेतल्यावर ते गरम असतानाच एका बाऊलमध्ये काढून त्याची सालं काढून घ्यावी.
३. पॅन व्यवस्थित गरम करून त्यात तेल ओतावं, तेल गरम झाल्यावर त्यात जिरे आणि लसूण पाकळ्या घालूंन त्या हलक्याशा परतवून घ्याव्यात.
४. या खमंग फोडणीत सालं काढून भाजून घेतलेले शेंगदाणे घालावेत.
५. मग यात चवीनुसार लाल तिखट मसाला, मीठ घालूंन २ ते ३ मिनिटे तेलात खमंग असे परतवून घ्यावे.
६. त्यानंतर सगळे मिश्रण हलकं कोमट असतानाच खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये ओतून त्याची जाडसर भरड होईल असे वाटून घ्यावे.
सोलापुरी अस्सल पारंपरिक पद्धतीची शेंगदाण्याची चमचमीत, चटपटीत चटणी खाण्यासाठी तयार आहे.
