उन्हाळा सुरू झाला की गार पाण्याची गरज प्रत्येकाला भासते. अनेक जण थेट फ्रिजमधील थंड पाणी पितात, पण पारंपरिक पद्धतीने मातीच्या माठात ठेवलेले पाणी हे अधिक नैसर्गिक, आरोग्यदायी आणि शरीराला सौम्य थंडावा देणारे असते. (Skip Fridge Water – Clay Pot Water Stays Cooler Longer - see how to keep It Fresh and Cool)मात्र माठातील पाणी खरोखरच गार राहावे आणि सुरक्षितही राहावे यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
माठातील पाणी गार राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माठ ठेवण्याची जागा. माठ नेहमी हवेशीर आणि सावलीत ठेवावा. थेट उन्हात ठेवला तर त्यातील पाणी लवकर गरम होते. माठाखाली लाकडी पाट किंवा स्टँड ठेवला तर त्याला हवा मिळते आणि थंडावा टिकून राहतो. माठाच्या बाहेर ओला फडका गुंडाळल्यास बाष्पीभवनामुळे पाणी अधिक गार राहते. तसेच माठ भरताना पूर्ण वरपर्यंत भरू नये, थोडी जागा रिकामी ठेवली तर पाणी नैसर्गिकरीत्या थंड होते. शक्यतो दिवसातून एकदा तरी पाणी बदलणेही फायदेशीर ठरते.
मातीचा माठ चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी त्याची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. नवीन माठ घेतल्यावर तो काही तास पाण्यात भिजत ठेवावा, त्यामुळे मातीतील धूळ आणि वास निघून जातो. आठवड्यातून किमान एकदा माठ आतून स्वच्छ धुवावा. यासाठी केमिकल क्लिनर वापरण्याऐवजी मीठ किंवा बेकिंग सोडा वापरून स्वच्छता करणे सुरक्षित असते. माठ धुतल्यानंतर पूर्णपणे कोरडा होऊ द्यावा आणि नंतरच त्यात पाणी भरावे. माठाला तडा गेला असेल किंवा पाणी झिरपत असेल तर तो वापरणे टाळावे. माठात वाळा घालून ठेवा. पाणी स्वच्छ आणि सुगंधी राहते.
माठात पाणी साठवताना स्वच्छ पिण्याचे पाणीच वापरणे आवश्यक आहे. शक्यतो फिल्टर केलेले किंवा उकळून थंड केलेले पाणी माठात भरावे. पाणी काढताना हात आत घालू नये, नेहमी स्वच्छ डाव किंवा टोटी असलेला माठ वापरावा. माठ झाकून ठेवणेही महत्त्वाचे आहे, त्यामुळे धूळ, किडे किंवा इतर घाण पाण्यात जाण्यापासून बचाव होतो. माठ खूप दिवस न वापरता ठेवायचा असेल तर तो पूर्ण कोरडा करून ठेवावा, अन्यथा त्यात बुरशी लागू शकते. फ्रिजच्या पाण्याच्या तुलनेत माठातील पाणी अधिक फायदेशीर मानले जाते. फ्रिजमधील अतिशय थंड पाणी अचानक शरीरात गेल्याने घसा दुखणे, सर्दी किंवा पचनासंबंधी त्रास होऊ शकतो. त्याउलट माठातील पाणी नैसर्गिक पद्धतीने थंड होत असल्याने ते शरीराला सौम्य आणि आरामदायी वाटते.
