Join us
Daily Top 2Weekly Top 5

फळ सडलं तर तेवढा भाग कापून बाकीचं फळ खाता? ही काटकसर जीवावर बेतते कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2026 15:55 IST

side effects of eating rotten fruits : eating spoiled fruit health risks : food poisoning from spoiled fruits : फळाच्या कोपऱ्यात दिसणारी बुरशी किंवा सडलेला भाग म्हणजे केवळ वरवरची समस्या नसते, तर ते एक धोक्याचे लक्षण ठरते.

अनेकदा आपण बाजारातून फळे विकत आणतो किंवा घरात ठेवलेली फळे काही दिवसांनी एका बाजूने खराब होतात. अशावेळी 'वाया नको' म्हणून आपण फक्त सडलेला भाग कापून टाकतो आणि उरलेले फळ अगदी आवडीने खातो. आपल्याला वाटते की आपण फळांची नासाडी किंवा ते असेच कचऱ्यात टाकून देण्यापासून वाचवत आहोत, पण प्रत्यक्षात आपण एकाचवेळी अनेक आजारांना निमंत्रण देत असतो. फळाच्या एका कोपऱ्यात दिसणारी बुरशी किंवा सडलेला भाग म्हणजे केवळ वरवरची समस्या नसते, तर ते एक धोक्याचे लक्षण असते(food poisoning from spoiled fruits).

फळं खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते, पण तीच फळे चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास विषासारखी ठरु शकतात. फळाचा काही भाग सडला असेल तर तो कापून उर्वरित भाग खाणे ही आपल्याकडे एक फारच कॉमन सवय आहे. आपल्याला वाटते की, खराब झालेला कापलेला भाग वेगळा केल्यामुळे उरलेले फळ खाण्यासाठी चांगले आहे. परंतु, डॉक्टरांच्या मते ही सवय पोटाचे गंभीर विकार आणि फूड पॉयझनिंगला कारणीभूत ठरू शकते. फिजिशियन आणि नेफ्रोलॉजिस्ट डॉ. भानु मिश्रा यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत या विषयावर अधिक माहिती सांगितली आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही सवय का धोकादायक (eating spoiled fruit health risks) आहे आणि यामुळे शरीरावर काय परिणाम होतात, ते पाहूयात... 

नेमकं होत काय ? 

प्रत्यक्षात फळाचा जो भाग आपल्याला काळा किंवा खराब झालेला दिसतो, तो बुरशीचा फक्त वरवरचा भाग आपल्या डोळ्यांना दिसतो. खरा धोका तर सडलेल्या फळाच्या आत लपलेला असतो, ज्याला 'मायसेलियम' (Mycelium) असे म्हणतात. ही बुरशीची अशी अत्यंत बारीक आणि डोळ्यांना न दिसणारी मुळे असतात, जी संपूर्ण फळाच्या आत कोळ्याच्या जाळ्यासारखी पसरलेली असतात. अशा परिस्थितीत जेव्हा आपण फळाचा काळा भाग कापून वेगळा करता, तेव्हा फक्त वरवरचा भाग आपण काढून टाकतो, पण फळाच्या खोलवर त्या बुरशीचे विष तसेच आत पसरलेले असते. ही बुरशी 'मायकोटॉक्सिन्स' (Mycotoxins) नावाचे एक विषारी रसायन सोडते. हे रसायन इतके घातक असते की, फळ उकळले किंवा शिजवले तरीही त्यातील विषारीपणा पूर्णपणे नष्ट होत नाही.

खराब झाल्यावर किंवा फळांचा काही भाग सडल्यावर कोणती फळं खावीत, कोणती खाऊ नये... 

प्रत्येक फळाची रचना वेगळी असते, त्यामुळे सर्वच फळे सडल्यानंतर सारखीच धोकादायक नसतात. काही फळांचा खराब भाग काढून उरलेला भाग खाणे शक्य असते, तर काही फळे पूर्णपणे विषारी होतात. 

१. मऊ आणि रसाळ फळे (Soft and Juicy Fruits):-  मऊ आणि रसाळ फळांमध्ये, संत्री, द्राक्षे, पीच, टोमॅटो आणि काकडी यांसारख्या फळांचा समावेश होतो. या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. अशा रसाळ फळांमध्ये बुरशीची मुळे आणि विषारी घटक काही सेकंदात संपूर्ण फळात पसरतात. त्यामुळे अशा फळांना थोडा जरी डाग किंवा सडलेला भाग दिसला, तर ते कापून न खाता थेट फेकून देणेच सुरक्षित ठरते.

२. कडक फळे आणि भाज्या (Hard Fruits and Vegetables) :- या प्रकारांत गाजर, सफरचंद, सिमला मिरची किंवा कोबी यांसारख्या फळांचा व भाज्यांचा  समावेश होतो. या प्रकारच्या फळं आणि भाज्या कडक आणि कठीण असतात, त्यामुळे बुरशीला त्यांच्या आत खोलवर शिरकाव करणे कठीण जाते. अशा परिस्थितीत, जर सफरचंदासारख्या कडक फळाला छोटासा सडलेला भाग असेल, तर तो भाग व्यवस्थित कापून काढून उरलेला स्वच्छ भाग खाणे तुलनेने सुरक्षित असू शकते.

थंडीत सर्दी - खोकला वाढून कफ होतो ? घ्या फक्त चमचाभर मधाचे 'असे' चाटण आणि कफ होईल 'छूमंतर - मिळेल आराम... 

कंबरेचा घेर होईल २८ आणि पोट - मांड्याही होतील सुडौल, या एका लालचुटुक फळाचा रस करेल कमाल, सोपा उपाय...

१ इंचाचा सोपा नियम करा फॉलो... 

कडक फळांचा सडलेला भाग कापण्यासाठी, तज्ज्ञ '१- इंचाचा नियम' पाळण्याचा सल्ला देतात. या नियमानुसार, जिथे फळ सडलेले आहे फक्त तेवढाच भाग न कापता, त्याच्या आजूबाजूचा १ इंच अतिरिक्त चांगला भागही कापून फेकून द्यावा. असे केल्यामुळे, जर बुरशीची मुळे थोडी पुढे पसरली असतील, तर ती निघून जातात. सडलेला भाग कापल्यानंतर चाकू स्वच्छ धुतल्याशिवाय फळाच्या चांगल्या भागाला स्पर्श करू नका, अन्यथा संसर्ग पुन्हा पसरू शकतो.

अशी खराब झालेली फळं खाणं धोकादायक... 

जर आपण वारंवार सडलेल्या फळांचा स्वच्छ दिसणारा भाग कापून खात असाल, तर ते तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. यामुळे 'मायकोटॉक्सिन्स' आपल्या शरीरात हळूहळू जमा होऊ लागतात. अनेकदा अशी फळे खाल्यामुळे लगेचच उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. दीर्घकाळ अशा सवयीमुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये हे लिव्हर कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते. लहान मुले आणि ज्येष्ठांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांच्यासाठी हा संसर्ग जीवघेणा ठरू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Cutting off rotten fruit parts? This thriftiness endangers your life.

Web Summary : Eating fruit with cut-off rotten parts invites diseases. Hidden mold spreads toxins, causing stomach issues, weakened immunity, and even liver cancer. Hard fruits are safer.
टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्स