घरच्याघरीच लावलेल्या दह्यापासून लोणी काढणे हे एखाद्या कलेपेक्षा कमी नाही. परंतु अनेकदा योग्य माहिती नसल्यामुळे हे काम थकवणारे आणि वेळखाऊ होऊ शकते. अनेक गृहिणींची अशी तक्रार असते की, त्यांचे लोणी विकतसारखे दाणेदार आणि पांढरेशुभ्र होत नाही. परंतु याउलट जर लोणी तयार करण्याची योग्य पद्धत आणि अचूक रेसिपी माहित असेल तर मऊसूत लोणी काढण्याचं कमी अगदी मिनिटभरात चुटकीसरशी होत... स्वयंपाकघरात लोण्याचा सुगंध दरवळला की लगेच ते मऊसर, लुसलुशीत लोणी खाण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाही...पण हे तूप काढण्यासाठी आधी कित्येक दिवस दुधाची साय साठवावी लागते, तिचा कुबट वास येऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते आणि मग कुठेतरी वाटीभर लोणी निघतं. पण थोडा विचार करा, जर तुम्हाला साय साठवण्याच्या कटकटीशिवाय, थेट दह्यापासूनच लोणी काढता आलं तर?(secret trick to make butter from curd)
अनेकदा साय साठवण्यासाठी फ्रिजमध्ये जागा नसते किंवा साय खराब होण्याची भीती असते. अशा वेळी 'दह्यापासून लोणी' काढण्याची ही पारंपारिक आणि सोपी पद्धत एखाद्या जादूसारखी काम करते. यामुळे लोणी (how to make butter from curd quickly) तर चविष्ट निघतच, पण त्यासोबत मिळणारं ताजं ताक आरोग्यासाठी अमृत ठरतं. साय साठवण्याचं (make butter from curd at home) टेन्शन विसरा आणि फक्त दह्याचा वापर करून मिनिटांत लोणी कसं काढायचं याची साधीसोपी ट्रिक पाहूयात.
थेट दह्यापासूनच ताजे - मऊसूत, लुसलुशीत लोणी काढण्याची सोपी पद्धत...
कुकिंग एक्सपर्ट श्वेता खैरनार यांनी दह्यापासून लोणी तयार करण्याची एक साधीसोपी ट्रिक त्यांच्या batati.being.batati या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे. या पद्धतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्हाला तासंतास मेहनत करण्याची गरज पडत नाही. फक्त तापमानाचा योग्य समतोल आणि थंड पाण्याचा वापर केल्यास, काही मिनिटांतच मलईदार - मऊसूत लोणी तयार होते.
लोणी बनवण्याची खरी सुरुवात चांगल्या दह्याच्या निवडीपासून होते. कुकिंग एक्सपर्ट श्वेता खैरनार यांच्या मते, जर तुम्हाला जास्त प्रमाणात आणि चविष्ट लोणी हवे असेल, तर थोडे आंबट आणि घट्ट दही वापरणे सर्वात फायदेशीर ठरते. दह्यातील हलका आंबटपणा लोणी लवकर वेगळे करण्यास मदत करतो. तसेच, फ्रिजमधील थंड दही वापरा, जेणेकरून लोणी मऊ किंवा पातळ न पडता व्यवस्थित घट्ट निघेल.
सर्वात आधी एका खोल पसरट भांड्यात २ ते ३ कप दही घ्या. आता हे दही फेटण्यासाठी तुम्ही हँड विस्क, ब्लेंडर किंवा अगदी मोठ्या चमच्याचाही वापर करू शकता. सगळ्यांत सोपं म्हणजे आपण मिक्सरच्या देखील वापर करु शकता. मिक्सरच्या भांड्यात दही आणि थोडं पाणी घातल्यास मिश्रण चटकन फेटून तयार होत. हे दही काही मिनिटांपर्यंत सतत एकाच दिशेने हलवत फेटून घ्या. काही वेळ घुसळल्यानंतर दह्याचे स्वरूप बदलू लागेल आणि ते हलके होऊन वर तरंगू लागेल. दही घुसळत असताना त्यात हळूहळू अर्धा ते एक कप बर्फाचे थंडगार पाणी घाला. थंड पाणी टाकल्यामुळे लोणी लगेच जमा होऊ लागते आणि दह्यापासून वेगळे होऊन वर तरंगू लागते. जर तुम्ही कोमट किंवा साध्या पाण्याचा वापर केला, तर लोणी वितळू शकते आणि त्याचे टेक्श्चर खराब होऊ शकते.
जसजसे तुम्ही थंड पाणी घालून दही घुसळत राहाल, तसतसे तुम्हाला दह्याच्या पृष्ठभागावर पांढरे शुभ्र छोटे-छोटे दाणे दिसू लागतील, हेच ते मऊसूत दाणेदार पांढरेशुभ्र लोणी...जेव्हा सर्व लोणी वर तरंगू लागेल आणि खाली फक्त पातळ ताक शिल्लक राहील, तेव्हा तुमची लोणी काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे समजावे.
एकदा का लोणी एकत्र जमा झाले की, ते हाताने किंवा चमच्याच्या मदतीने हळूवारपणे काढून घ्या. आता एका दुसऱ्या भांड्यात थंड पाणी घ्या आणि त्यामध्ये हे लोणी २ ते ३ वेळा व्यवस्थित धुवून घ्या. असे केल्यामुळे लोण्यामध्ये असलेला दह्याचा आंबटपणा निघून जातो आणि ते जास्त काळ टिकण्यास मदत होते. स्वच्छ धुवून झाल्यानंतर तुमचे लोणी एकदम पांढरेशुभ्र आणि ताजे दिसेल. लोणी काढून झाल्यानंतर जे पांढरं पाणी उरतं, ते दुसरं तिसरं काही नसून शुद्ध ताक असते. कुकिंग एक्सपर्ट श्वेता खैरनार यांचा सल्ला आहे की, हे ताक कधीही फेकून देऊ नका. यामध्ये थोडं भाजलेलं जीरं, काळं मीठ आणि कोथिंबीर टाकून तुम्ही एक उत्तम 'मसाला ताक' तयार करू शकता. हे ताक पचनासाठी अत्यंत फायदेशीर आणि आरोग्यदायी असते.
दह्यापासून लोणी काढण्याचे फायदे...
१. दररोज साय काढून ती फ्रिजमध्ये साठवून ठेवण्याचे टेन्शन उरत नाही.
२. लोणी काढल्यानंतर जे उरते ते म्हणजे 'ताक'. हे ताक अत्यंत चविष्ट आणि पचनासाठी हलके असते.
३. अनेक दिवस साय साठवल्यामुळे तिला एक प्रकारचा कुबट वास येतो, तसा प्रकार दह्यापासून लोणी काढताना होत नाही.
४. या लोण्यापासून बनवलेले तूप अत्यंत दाणेदार, सुवासिक आणि शुद्ध असते.
५. हे लोणी ताज्या दह्यापासून बनलेले असल्यामुळे ते अधिक आरोग्यदायी मानले जाते.
Web Summary : Skip days of collecting cream! This simple method uses curd and cold water to make butter in minutes. Enjoy fresh butter and buttermilk effortlessly.
Web Summary : क्रीम जमा करने के दिन भूल जाइये! यह आसान तरीका दही और ठंडे पानी का उपयोग करके मिनटों में मक्खन बनाता है। ताज़ा मक्खन और छाछ का आनंद लें।