Join us

Shravan Special Recipe: खमंग, खुटखुटीत, चटकदार कोथिंबीर वडी, वाढवेल शोभा नैवेद्याच्या पानाची; पाहा रेसेपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2025 15:27 IST

Shravan Special Recipe: लसूण न वापरताही श्रावणात कोथिंबीर वडी करता येईल, त्यासाठी प्रमाण मात्र मोजून मापूनच घ्या!

कोथिंबीर वडी ही महाराष्ट्राची शान. ती करायला सोपी असली, तरी न तुटता खुटखुटीत वडी पाडणे हा कौशल्याचा भाग असतो. श्रावणात तुम्ही नैवेद्याच्या पानात वाढण्यासाठी कोथिंबीर वडी करणार असाल तर लसूण न वापरताही चविष्ट वडी करू शकता आणि इतर वेळी करण्यासाठी वैदेही भावे यांनी पुढे दिलेली रेसेपी प्रमाणासह सेव्ह करून ठेवू शकता. जी करायला सोपी आहे आणि खायलाही चटकदार असेल. 

कोथिंबीर वडी रेसेपी : 

साहित्य: 

३ जुड्या कोथिंबीर निवडून चिरलेलीसव्वा कप चणा पिठ१ कप पाणी१ टेस्पून तांदूळ पिठ७-८ लसूण पाकळ्या (नैवेद्यासाठी करत असल्यास स्किप करा)१ छोटा आल्याचा तुकडा, किसून६-७ हिरव्या मिरच्या१ टिस्पून हळद१ टिस्पून जिरे२ टेस्पून तेलचवीपुरते मिठ

कृती:

१) प्रथम लसूण, आले यांची पेस्ट करून घ्यावी. मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्याव्यात. कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घ्यावी. बारीक चिरून ठेवावी. 

२) चणा पिठात पाणी, तांदूळ पिठ घालून भज्यांसाठी जेवढे घट्ट पिठ भिजवतो तेवढे घट्ट भिजवावे. चवीपुरते मीठ घालावे. गुठळ्या राहू देवू नयेत. 

३) कढईत १ चमचा तेल गरम करावे. हळद, जिरे, आले-लसूण पेस्ट, मिरच्या यांची फोडणी करावी. त्यात कोथिंबीर अर्धा ते एक मिनीट परतावी. गॅस मध्यम ठेवावा. भिजवलेले पिठ घालावे आणि सतत ढवळत राहावे, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. मिश्रण घट्टसर होईस्तोवर ढवळावे आणि जर थोड्या गुठळ्या झाल्याच तर कालथ्याने मोडाव्यात.

४) बारीक गॅसवर कढईवर झाकण ठेवून वाफ काढावी. मिश्रण कढईच्या तळाला लागणार नाही याची काळजी घ्यावी. 

५) मिश्रणाला आवश्यक तेवढा घट्टपणा आला आहे कि नाही हे बघण्यासाठी कालथा मिश्रणात रोवून ठेवावा. जर तो सरळ उभा राहिला तर मिश्रण तयार झाले आहे असे समजावे. गॅस बंद करावा. मिश्रण शिजायला साधारण ८ ते १० मिनीटे लागतात. 

६) मिश्रण थोडे निवळले की परातीत किंवा स्टीलच्या ताटाला थोडे तेल लावून मिश्रण त्यावर समान थापावे. १ ते दिड सेंटीमिटरचा थर करावा. थापलेले मिश्रण थंड झाले कि वड्या पाडाव्यात. 

७) नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये २-३ चमचे तेल गरम करावे. पुर्ण पॅनमध्ये तेल पसरले गेले पाहिजे. तयार कोथिंबीर वड्या त्यात मध्यम आचेवर दोन्ही बाजू छान गोल्डन ब्राउन होईस्तोवर फ्राय कराव्यात.

टीप:१) तिखटपणा कमी-जास्त हवा असेल तर त्या प्रमाणात मिरच्या घालाव्यात.२) जर आवडत असेल तर या वड्या शालो फ्राय न करता डीप फ्रायसुद्धा करू शकतो.

टॅग्स :श्रावण स्पेशल पदार्थश्रावण स्पेशलअन्नपाककृती