इडल्या करायच्या म्हटलं की डाळ भिजवावी लागते, तांदूळ, डाळ सर्व काही दळावं लागतं. पण सोप्या पद्धतीनं पीठ न वाटता, तांदूळ न भिजवता तुम्ही इडल्या बनवू शकता. या इडल्या करण्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही फक्त सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील आणि इंस्टंट नाश्ता तयार होतील या इडल्या तु्म्ही नारळाची चटणी किंवा सांबारसोबत खाऊ शकता. (Rawa Besan Idli Recipe)
साहित्य
बारीक रवा-१/२ कप
बेसन -१ कप
दही-१/२ कप (ताजे)
पाणी अंदाजे- १/२ ते ३/४ कप
आले आणि मिरची पेस्ट १ चमचा -(बारीक ठेचलेले)
हळद -१/४ चमचा (रंगासाठी)
मीठ-चवीनुसार
इनो- फ्रूट सॉल्ट
१/२ छोटा चमचा (साधे/प्लेन)
तेल- इडली स्टँडला लावण्यासाठी
रवा बेसनाच्या इडल्या करण्याच्या स्टेप्स
इडलीचे मिश्रण तयार करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात बेसन, रवा आणि दही एकत्र घ्या. हळूहळू पाणी घालत जा आणि हे मिश्रण चांगले मिसळून घ्या. गुठळ्या होऊ नयेत याची काळजी घ्या. इडलीच्या नेहमीच्या पिठाप्रमाणेच याची कन्सिस्टन्सी ठेवा. या मिश्रणात आले-मिरचीची पेस्ट, हळद आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करा. हे मिश्रण झाकून साधारण १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा, जेणेकरून रवा चांगला फुलेल.
इडली कुकर किंवा स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. इडली स्टँडच्या साच्यांना ब्रशने थोडे तेल लावून तयार ठेवा. इडलीचे मिश्रण वाफवण्यासाठी ठेवण्याआधी, त्यात इनो फ्रूट सॉल्ट आणि त्यावर १ चमचा पाणी घाला. इनो घातल्यानंतर, मिश्रण हलक्या हाताने आणि एकाच दिशेने पटकन मिसळून घ्या. मिश्रण जास्त वेळ फेटू नका, नाहीतर इडली चांगली फुलणार नाही.लगेच हे मिश्रण तेल लावलेल्या इडली साच्यांमध्ये भरा. साचे पूर्ण भरू नका, कारण इडली वाफवल्यावर फुगते.
इडली स्टँड गरम पाण्यात ठेवा आणि कुकरचे झाकण (शिट्टी न लावता) बंद करा. मध्यम-ते-उच्च आचेवर साधारण १० ते १२ मिनिटे इडली वाफवा.१० मिनिटांनंतर सुरी किंवा टूथपिक इडलीमध्ये टाकून तपासा. सुरी स्वच्छ बाहेर आल्यास इडली शिजली आहे, अन्यथा आणखी २ मिनिटे वाफवा. इडली शिजल्यावर गॅस बंद करा आणि २ मिनिटे स्टँड थंड होऊ द्या.चमचा किंवा सुरीच्या मदतीने इडली साच्यातून अलगद काढा.
