उन्हाळ्याच्या दिवसांत जेवणात रंगत आणणारा पदार्थ म्हणजे कैरी. अगदी कैरीच्या फोडी आणि त्यांच्यावर भुरभुरलेलं तिखट आणि मीठ असं जरी जेवणात तोंडी लावायला घेतलं तरी जेवणाची मजा वाढते. अशावेळी जर तक्कू, इंस्टंट लोणचं, मेथांबा, कांदा- कैरीची चटणी असं काही जेवणात मिळालं तर क्या बात है.. म्हणूनच आता कैरी- टोमॅटो चटणी ही एक रेसिपी पाहा (summer special recipe of raw mango and tomato chutney). सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी ही रेसिपी सोशल मीडियावर शेअर केली आहे (Raw Mango and Tomato Chutney Recipe). ही चटणी एकदा करून ठेवली तर २ ते ३ दिवस फ्रिजमध्ये चांगली टिकते.(how make raw mango and tomato chutney?)
कुणाल कपूर स्पेशल कैरी- टोमॅटो चटणी रेसिपी
साहित्य
३ पिकलेले लालबुंद टोमॅटो
१ कैरी
४ ते ५ हिरव्या मिरच्या
६ ते ७ लसूण पाकळ्या
फोडणीसाठी तेल, जिरे, हिंग, मीठ
१ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
१ टीस्पून काळं मीठ
४ टीस्पून लिंबाचा रस
१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१ चमचा काश्मिरी लाल तिखट
चवीनुसार मीठ
कृती
सगळ्यात आधी कैरी आणि टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या. कैरीची सालं काढून तिच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या.
टोमॅटो मधोमध चिरून एका टोमॅटोचे दोन तुकडे याप्रमाणे चिरून घ्या.
यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फाेडणी करून घ्या.
फोडणी झाल्यानंतर टोमॅटो, कैरी, मिरच्या आणि लसूण पाकळ्या कढईमध्ये ठेवून परतून घ्या. कैरी आणि टोमॅटो खमंग परतून झाल्यानंतर गॅस बंद करा.
टोमॅटो आणि कैरी थंड झाल्यानंतर मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या. यानंतर ही चटणी एका भांड्यात काढून त्यामध्ये काश्मिरी लाल तिखट, मीठ, लिंबाचा रस घाला. लिंबाचा रस नाही घातला तरी चालेल. तुम्हाला जर आंबट गोड चव आवडत असेल तर गूळ घातला तरी चालेल.
आता या चटणीमध्ये बारीक चिरलेला कच्चा कांदा आणि काेथिंबीर घालून तिचा आस्वाद घ्यावा..