Join us

राखीपौर्णिमा स्पेशल: तोंडात टाकताच विरघळेल अशी ओल्या नारळाची करंजी; घ्या परफेक्ट कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2023 13:21 IST

Naral karanji Recipe : करंजी कधी तळताना फुटते तर कधी सारणाचा गोंधळ होतो, असे होऊ नये म्हणून...

राखीपौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीच्या भागात हा सण अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. पावसामुळे बंद असलेली मासेमारी नारळीपौर्णिमेनंतर पुन्हा नव्या जोमाने सुरू केली जाते. या दिवशी समुद्राची आणि नारळाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. नारळी पौर्णिमा म्हणत असल्याने या दिवशी नारळापासून तयार केलेल्या गोड पदार्थांना विशेष महत्त्व असते. यामध्ये नारळी भात, नारळाच्या वड्या, नारळाचे लाडू यांबरोबरच ओल्या नारळाच्या करंज्या आवर्जून केल्या जातात. करंजीचा बेत परफेक्ट जमला तर ठिक नाहीतर या करंज्या फसतात. कधी त्या तळताना फुटतात तर कधी सारणाचा गोंधळ होतो. असे होऊ नये आणि करंज्यांचा बेत चांगला व्हावा यासाठी करंज्या कशा करायच्या पाहूया (Naral karanji Recipe)...

साहित्य -

१. ओल्या नारळाचा चव - २ वाट्या 

२. साखर - दिड वाटी

३. वेलची पूड - अर्धा चमचा 

(Image : Google)

४. मैदा - १ वाटी 

५. रवा - १ वाटी 

६. तेल - २ वाट्या

७. दूध - १ वाटी 

कृती -

१. एका कढईत नारळाचा चव घालावा. त्यामध्ये साखर आणि वेलची पूड घालून याचे घट्टसर चांगले मिश्रण करुन घ्यावे.

२. यामध्ये तूप, पाणी यांचा अजिबात वापर न केल्यास हे नारळाचे सारण अतिशय छान होते. 

३. दुसरीकडे रवा आणि मैदा घेऊन त्यात १ वाटी दूध आणि १ वाटी पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यावे. यामध्ये तेलाचे मोहन घातल्यास आवरण चांगले खुसखुशीत होण्यास मदत होते. हे पीठ काही वेळासाठी झाकून ठेवावे. 

४. मग या पीठाचे एकसारखे गोळे करायचे आणि त्याच्या पुऱ्या लाटायच्या. यामध्ये हे सारण भरुन करंजी व्यवस्थित बंद करायची आणि तेलात सोनेरी रंगाची होईपर्यंत तळायची.  

५. कडा उघडू नयेत आणि करंजी फुटू नये यासाठी या कडांना दूध लावावे. 

टॅग्स :अन्नपाककृतीरक्षाबंधनकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.