Join us
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्याशुभ्र मुळ्याचं चटपटीत इंस्टंट लोणचं! मुळा पाहून नाक मुरडणारेही चवीने खातील, घ्या रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2025 15:37 IST

Radish Pickle Recipe: अतिशय आरोग्यदायी असणाऱ्या मुळ्याचं चटपटीत लोणचं करण्याची अगदी सोपी रेसिपी..(instant recipe of mooli ka achar)

पांढराशुभ्र मुळा दिसायला अतिशय आकर्षक असतो. त्याचा पांढरा रंग आणि एका बाजुला त्याला असणारा हिरवागार पाला पाहिला की लगेच तो घ्यावा वाटतो. पण हा मुळा जेवढा छान दिसतो, तेवढाच त्याचा वास उग्र असतो. त्यामुळे मुळा पाहून कित्येकजण नाक मुरडतात. खरंतर फक्त हिवाळ्याच्या दिवसांतच मिळणारा मुळा आवर्जून खायला हवा (winter special food). कारण तो अतिशय आरोग्यदायी असतो. पण घरातल्या मंडळींना तर तो पानातही नको असतो. म्हणूनच अशावेळी मुळ्याचं चटपटीत लोणचं करा. हे लोणचं जर तुम्ही जेवणात प्रत्येकाच्या पानात वाढलं तर सगळेच आवडीने खातील (instant recipe of mooli ka achar). आपण मुळ्याचं लोणचं खात आहोत, हे देखील त्यांच्या लक्षात येणार नाही (how to make radish pickle?). बघा अतिशय झटपट होणारी ही खास रेसिपी

मुळ्याचं लोणचं रेसिपी 

 

साहित्य

अर्धी वाटी मुळ्याचे काप

अर्धी वाटी गाजराचे काप मुळ्याचा उग्रपणा कमी करण्यासाठी या लोणच्यामध्ये गाजर अवश्य टाकायला हवं.

१ चमचा जिरे आणि पाव चमचा मेथ्या

१ चमचा मोहरी आणि बडिशेप

२ चमचे लिंबाचा रस

पाव कप तेल, चिमूटभर हिंग आणि थोडीशी हळद

चवीनुसार तिखट आणि मीठ 

 

कृती

मुळा आणि गाजर दोन्हीही स्वच्छ धुवून घ्या आणि एका कोरड्या कपड्याने पुसून घ्या. मुळा आणि गाजरामध्ये पाण्याचा ओलावा अजिबात राहता कामा नये, नाहीतर लोणचं खराब होऊ शकतं. यानंतर मुळा आणि गाजराचे उभे उभे काप करून घ्या. 

गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यानंतर जिरे, मोहरी, बडिशेप मंद आचेवर ७ ते ८ मिनिटे खमंग भाजून घ्या. हे पदार्थ भाजून घेतल्यानंतर मग मेथ्या घाला आणि त्याही हलक्या भाजून घ्या. हे पदार्थ थंड होऊ द्या आणि मग मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.

यानंतर पाव कप तेल गरम करून घ्या. तेलामध्ये चिमूटभर हिंग, चवीनुसार लाल तिखट आणि पाव टीस्पून हळद घाला. यानंतर तेल थंड होऊ द्या. आता मुळा आणि गाजराचे काप एका पसरट भांड्यात काढा. त्यामध्ये मिक्सरमधून बारीक केलेला मसाला, मीठ आणि गरम केलेलं तेल घाला. सगळ्यात शेवटी त्यामध्ये लिंबाचा रस घाला आणि सगळं लोणचं व्यवस्थित हलवून घ्या. हे लाेणचं ८ ते १० दिवस चांगलं टिकतं.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Instant Radish Pickle Recipe: A tasty twist even radish-haters will love!

Web Summary : Make a quick and flavorful radish pickle with carrots, spices, and lemon juice. This easy recipe transforms disliked radishes into a delicious condiment that everyone will enjoy. Ready in minutes!
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.हिवाळाहिवाळ्यातला आहारथंडीत त्वचेची काळजी