'कोथिंबीर वडी' हा महाराष्ट्रीयन थाळीतील खमंग, चविष्ट आणि लोकप्रिय पदार्थ... गरमागरम, कुरकुरीत, खुसखुशीत कोथिंबीर वडी खाण्याची मज्जा काही औरच असते... कोथिंबीर वडी पारंपरिक पद्धतीने करायची म्हटलं की, बेसन पिठाचा वापर हमखास मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु आपण याच नेहमीच्या पारंपरिक पद्धतीच्या कोथिंबीर वडीला एक ट्विस्ट देत (no besan kothimbir vadi recipe) भिजवलेल्या हरभरा डाळीचा वापर करून देखील चविष्ट कोथिंबीर वडी तयार करू शकतो. भिजवलेली हरभरा डाळ वापरून तयार केलेली कोथिंबीर वडी चवीला अधिक खमंग, खुसखुशीत आणि आरोग्यासाठी पौष्टिक असते(kothimbir vadi without besan).
डाळ वाटून केलेल्या या वड्या वरून जेवढ्या कुरकुरीत लागतात, तेवढ्याच त्या आतून मऊ आणि चविष्ट होतात. जर आपल्याला नेहमीच्या कोथिंबीर वडीला अधिक 'हेल्दी' आणि 'प्रोटीन-युक्त' करायचे असेल, तर ही रेसिपी नक्कीच खूप (healthy coriander vadi recipe) फायदेशीर ठरते. कमी तेलात, बेसन पीठ न वापरता (protein rich kothimbir vadi) तयार होणाऱ्या या कोथिंबीर वड्या नाश्ता, डब्यासाठी किंवा चहासोबत खाण्यासाठी एक परफेक्ट पर्याय आहे. फारशी मेहेनत न घेता, अगदी झटपट आणि हेल्दी पद्धतीने कोथिंबीर वड्या तयार करण्याची साधीसोपी रेसिपी पाहूयात...
साहित्य :-
१. हरभरा डाळ - १ कप (पाण्यांत भिजवलेली डाळ)
२. हिरव्या मिरच्या - २ ते ३ (बारीक चिरलेल्या मिरच्या)
३. ओवा - १/२ टेबलस्पून
४. लसूण - ३ ते ४ पाकळ्या
५. आलं - १/२ टेबलस्पून (बारीक किसलेलं)
६. जिरे - १/२ टेबलस्पून
७. कोथिंबीर - १ कप (बारीक चिरलेली)
८. हळद - १/२ टेबलस्पून
९. मीठ - चवीनुसार
१०. खायचा सोडा - चिमूटभर
११. तांदुळाचे पीठ - ४ ते ५ टेबलस्पून
१२. तेल - तळण्यासाठी
कृती :-
१. एका मिक्सरच्या भांड्यात ६ ते ७ तास पाण्यात भिजवलेली हरभरा डाळ घेऊन त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ओवा, जिरे, लसूण, आलं घालून व्यवस्थित बारीक वाटून घ्यावे. त्याची जाडसर घट्ट अशी पेस्ट तयार करून घ्यावी.
२. एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊन त्यात ही मिक्सरमध्ये वाटून घेतलेली पेस्ट घालावी.
३. मग या मिश्रणात चवीनुसार मीठ, हळद, खायचा सोडा, तांदुळाचे पीठ घालून सगळे मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावे.
४. तयार मिश्रणाचे मध्यम आकाराचे दंडगोलाकार असे रोल तयार करून घ्यावे.
५. मग प्रेशर कुकर किंवा कढईमध्ये थोडे पाणी उकळवून त्यावर जाळी ठेवून हे रोल ठेवून वाफेवर १५ ते २० मिनिटे वाफवून घ्यावे.
६. रोल व्यवस्थित वाफवून घेतल्यावर त्याचे छोटे - छोटे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्यावेत.
७. गरम तेलात या तयार कोथिंबीर वड्या सोडून दोन्ही बाजूने खरपूस अशा तळून घ्याव्यात.
बेसन पिठाचा वापर न करता खमंग, खुसखुशीत, हेल्दी अशा चविष्ट कोथिंबीर वड्या खाण्यासाठी तयार आहेत.
