Join us

भाजी करायला वेळ नाही करा मस्त आलू रायते; चव अशी भारी की जेवण होईल मस्त आणि पोटभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2023 16:56 IST

Potato Raita Recipe : जेवणात तोंडी लावायला झटपट पण चविष्ट काहीतरी हवं असेल तर..

बटाटा म्हणजे अनेकांची अतिशय आवडीची भाजी. अडीनडीला केव्हाही आपल्या कामी येणारी ही भाजी, घरातली भाजी संपली असेल किंवा डब्याला झटपट काहीतरी करायचं असेल तर आपण आवर्जून बटाट्याची भाजी करतो. यातही कधी आपण बटाट्याच्या काचऱ्या करतो तर कधी उकडून डोसा भाजी करतो. वाटण घालून केलेली रस्सा भाजी किंवा कांदा-टोमॅटो घालून केलेली बटाटा भाजी तर आपण कधीतरी मुद्दाम करतो. आता हे झालं बटाट्याच्या भाजीविषयी. पण याच बटाट्याचे छान रायतेही करता येते. जेवणात डाव्या बाजूला वाढायला कोशिंबीर किंवा रायते असले की जेवणाची रंगत वाढते. हेच बटाट्याचे रायते कसे करायचे पाहूया (Potato Raita Recipe)...

साहित्य - 

१. बटाटे - २ 

२. दही - अर्धी वाटी

३. कोथिंबीर - अर्धी वाटी

(Image : Google)

४. जीरे - अर्धा चमचा

५. मीठ - अर्धा चमचा 

६. साखर - १ चमचा 

७. हिरवी मिरची - १ 

८. तेल - २ चमचे 

कृती -

१. बटाटे कुकरमध्ये उकडून घ्यायचे आणि त्याची साले काढायची. 

२. या उकडलेल्या बटाट्याचे बारीक तुकडे करुन त्यामध्ये दही घालावे. 

३. मग यावर मीठ, साखर घालून सगळे चांगले एकजीव करुन घ्यावे.

४. छोट्या कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जीरे घालावेत. 

५. जीरं तडतडलं की त्यामध्ये मिरचीचे तुकडे घालावेत.

६.  सगळ्यात शेवटी यावर बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालावी. 

७. हे रायतं गार करायला फ्रिजमध्ये ठेवावं. पोळी, पुलाव कशासोबतही ते अतिशय छान लागते. 

८. यामध्ये आवडीनुसार आपण डाळींबाचे दाणे, खारी बुंदी असे काहीही घालू शकतो.

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.