संध्याकाळी तुम्हालाही भूक लागते का ? लागल्यावर मग चटरपटर काहीतरी खाता? आपण तेलकट तळलेले पदार्थ चहाबरोबर खातो. पण मग मात्र पित्ताचा त्रास होतो. डोकं दुखत, कधीतरी उलट्याही होतात. रात्रीचं जेवण नीट जात नाही. मग काय करायचं? संध्याकाळची भूक मारायची का? संध्याकाळच्या वेळी भूक लागणं स्वाभाविक आहे. संध्याकाळचा नाश्ता बंद करण्यापेक्षा हे दोन पदार्थ तयार करून खाऊन बघा. अजिबात बाधणार नाहीत.
१. पोह्याचे कटलेट
साहित्य:
पोहे, बटाटा, गाजर, फरसबी, आलं, आमचूर पावडर, दाण्याचं कुट, मीठ, पांढरे तीळ, तेल
कृती:
१. बटाटा, गाजर, फरसबी उकडून घ्या.
२. पोहे भिजत घाला. आणि तीनदा तरी धुवून घ्या.
एका भांड्यात सगळ्या उकडलेल्या भाज्या घ्या. आलं किसून घाला. हळद घाला. आमचूर पावडर घाला. पांढरे तीळ घाला. दाण्याचं कुट घाला. सगळं मिश्रण कालवून घ्या. मीठ घाला.
३. त्यात आता भिजवलेले पोहे घाला. सगळं कालवून घ्या. पाणी घालू नका.
४. आता त्या मिश्रणाचे कटलेट करून घ्या. चपटे गोल आकार त्याला द्या. आकाराला लहानच ठेवा म्हणजे कुरकूरीत होतील.
४. आता तव्यावर अगदी थोड्याशा तेलावर परतून घ्या.
२. बीटाचे अप्पे
साहित्य:
बीट, तांदळाचे पीठ, उडदाच्या डाळीचे पीठ, मीठ, तेल, रवा, कोथिंबीर, इनो
कृती:
१. बीट उकडून घ्या. आणि किसून घ्या.
२. बीट, तांदळाचे पीठ, उडदीचे पीठ, रवा, कोथिंबीर एकत्र करून छान मिश्रण तयार करा. चवीनुसार मीठ घाला.
३. पाणी घालून थोडं पातळ करून घ्या. अति पातळ नको. त्यात थोडं इनो घाला. इनोमुळे अप्पे छान फुलतात.
४. अप्पेपात्राला तेल लावून घ्या. आणि अप्पे घालून घ्या.
५. अप्पे व्यवस्थित शिजले की ताटात काढून घ्या. चटणीशी लावून गरमागरम खा.
संध्याकाळीच नाही तर, सकाळच्या नाष्ट्यासाठीही हे पदार्थ फार चांगले आहेत. लहान मुलांनाही फार आवडतील. विकतचे तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा घरचे पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ जास्त चांगले.