Join us

कांदा, बटाटा भजी नेहमीचीच; ट्राय करा कुरकुरीत पालकाची भजी, एकदा खाल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2023 09:55 IST

Palak Pakora Bhaji Recipe : ही रेसिपी झटपट होणारी असल्याने घरात पालक असेल तर अगदी काही मिनीटांत ही कुरकुरीत भजी तयार होऊ शकतात.

पालक आरोग्यासाठी चांगला असतो म्हणून त्याचा आहारात जास्तीत जास्त समावेश करायला हवा असे आपण नेहमी ऐकतो. त्यासाठी आपण पालकाची भाजी, पालक पराठे, पालक पुरी, पालक राईस असे पालकाचे विविध प्रकार करतो. पण पावसाळ्याच्या दिवसांत सगळ्यांना आवडणारा प्रकार म्हणजे भजी. बाहेर पाऊस पडत असताना वाफाळता चहा आणि गरमागरम भजी हे कॉम्बिनेशन काही औरच. यातही आपण कांद्याची, बटाट्याची भजी नेहमीच करतो. मात्र पालकाची भजी आपण विशेष ट्राय करत नाही. आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या या पालकाची भजी चवीला तर उत्तम असतातच पण ती पोषण देणारीही असल्याने एकदा तरी नक्की ट्राय करुन पाहा (Palak Pakora Bhaji Recipe).

पालकात मॅग्नेशियम, फोलेट, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-के, पोटॅशियम, कॅल्शियम आणि इतर अनेक पोषक तत्वे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पालकात कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असल्याने ते हृदय आणि स्नायूंच्या सुरळीत कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास तसेच अँटीऑक्सिडंट्स असल्याने कोलेस्ट्रॉलची नियंत्रणात ठेवण्यास पालक फायदेशीर असतो. संध्याकाळी चहाच्या वेळी किंवा घरी अचानक कोणी पाहुणे आल्यावर ही रेसिपी झटपट होणारी असल्याने घरात पालक असेल तर अगदी काही मिनीटांत ही कुरकुरीत भजी तयार होऊ शकतात. पाहूयात पालकाची भजी कशी करायची. 

(Image : Google)

साहित्य -

१. बेसन - १ वाटी 

२. पालकाची पाने - २० ते २५ 

३. तिखट - अर्धा ते पाऊण चमचा 

४. मीठ - चवीनुसार

५. ओवा - अर्धा चमचा 

६. हळद - अर्धा चमचा 

७. तेल - साधारण १ वाटी 

कृती -

१. सगळ्यात आधी पालक निवडून त्यातील लहान पाने वेगळी करुन ती स्वच्छ धुवून एका चाळणीत ठेवायची. 

२. दुसरीकडे भजीसाठी पीठ तयार करताना बेसन, मीठ, हळद, तिखट आणि ओवा एकत्र करायचे. 

(Image : Google)

३. यामध्ये अंदाजे पाणी घालून घट्टसर पीठ भिजवायचे. 

४. गॅसवर कढईत तेल घेऊन ते चांगले तापवायला ठेवायचे. 

५. पालकाची एक एक पाने या पीठात बुडवन ती तळायला तेलात सोडायची. 

६. सगळ्या बाजुने ही पाने हलवून आणि त्यावर तेल घालून कुरकुरीत तळून काढायची. 

७. ही गरमागरम भजी पावसात चहासोबत किंवा नुसतीही अतिशय छान लागतात, ही भजी कितीही खाल्ली तरी मन भरत नाही. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.मोसमी पाऊस