गाजराचे विविध पदार्थ आपण खातो. गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी फार चांगले असते. (Nutritious carrot soup is good for the eyes, drink it with joy during the monsoon )तसेच आरोग्यासाठी उपयुक्त असणारी पोषणसत्वे गाजरात असतात. गाजराचे सूप हा पदार्थ फार पौष्टिक आहे. करायला अगदी सोपे आहे. या पद्धतीने ही रेसिपी करा नक्की आवडेल. करायला फारच सोपी आहे.
साहित्य
कांदा, लसूण, गाजर, आलं, पाणी, काळी मिरी पूड, हिरवी मिरची, तेल, मीठ
कृती
१. छान ताजी गाजरे वापरा. चवीला गोडसर असणारी गाजरे तपासा आणि तीच घ्यायची. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. लसूण मस्त बारीक चिरायचा. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या. मिरचीचा अति वापर टाळा. आल्याचा लहानसा तुकडा किसून घ्यायचा. गाजर धुवायचे आणि सोलून घ्यायचे. गाजराचे पातळ गोल काप करायचे.
२. एका कढईत थोडे तेल घ्यायचे. तेलावर लसणाचे तुकडे घालायचे आणि खमंग परतायचे. लसूण परतून झाल्यावर त्यात किसलेले आले घाला आणि आले ही परता. आल्याचा वास सुटल्यावर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. मिरची मस्त परतायची. तेल अगदी चमचाभरच घ्यायचे. कारण सूप पौष्टिक करायचे आहे. आलं मिरची लसूण परतल्यावर त्यात कांदा घालायचा आणि मंद आचेवर परतायचे. कांदा छान गुलाबी झाल्यावर त्यात गाजराचे तुकडे घालायचे. गाजर जरा मऊ होऊ द्यायचे. गाजर परतल्यावर त्यात पाणी घालायचे. प्रमाण घेताना दोन मोठी गाजरे घेत असाल तर एक लहान कांदा घ्यायचा. इतर पदार्थ आवडीनुसार घ्यायचे. पाणी जरा जास्त ठेवायचे.
३. पाणी ओतल्यावर सूप झाकून ठेवायचे आणि पाणी आटू द्यायचे. पाणी आटून निम्मे होईल मग गॅस बंद करायचा आणि मिश्रण गार करत ठेवायचे. गार झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात ओतायचे आणि छान वाटून घ्यायचे. सगळे पदार्थ मस्त वाटले गेले पाहिजेत. वाटून झाल्यावर कढईत ओतायचे मंद आचेवर पुन्हा गरम करायचे. त्यात चवी पुरते मीठ घालायचे आणि आवडीनुसार काळी मिरी पूड घालायचा. सूप छान ढवळायचे. घट्टपणा जसा हवा त्यानुसार पाणी घाला. गरमागरम प्या.