Food Cravings Causes : वेगवेगळे पदार्थ खाणं तर सगळ्यांनाच आवडत असतं. कुणाला गोड खाणं आवडतं, कुणाला आंबट, कुणाला तिखट तर कुणाला चटकदार. लोक वेळोवेळी त्यांचे आवडीचे पदार्थ खातच असतात. कुणी काही चहा-नाश्त्यासोबत खातात, कुणी जेवण झाल्यावर गोड खातात तर काही लोक सतत काही ना काही चटर-बटर खातच राहतात. पण अनेकदा काही लोकांना अचानक एखाद्या विशिष्ट वेळी खाण्याची इच्छा होते, ज्याला फूड क्रेविंग म्हणतात.
कधी-कधी असं काहीतरी खाण्याची इच्छा होणं कॉमन आहे. पण जर असं नेहमीच होत असेल तर याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अचानक एखादा खास पदार्थ खाण्याची इच्छा का होत असेल? शरीरात काही पोषक तत्व कमी झाल्यामुळे तर असं होत नसेल ना? तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
प्रसिद्ध न्यूट्रिएंट्स श्वेता शाह यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे. त्यानी कोणत्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे फूड क्रेविंग होते हे सांगितलं.
बर्फ खाण्याची क्रेविंग होण्याचं कारण
श्वेता शाह म्हणाल्या की, जर तुम्हाला बर्फ खाण्याची क्रेविंग होत असेल तर हा शरीरात आयर्न कमी झाल्याचा संकेत असू शकतो. आयर्न मिळवण्यासाठी तुम्ही एक चमचा हलीम आणि एक चमचा गूळ नियमित खाल्ला पाहिजे.
चॉकलेट खाण्याची क्रेविंग
बऱ्याचदा काहींना कधीही चॉकलेट खाण्याची इच्छा होते. पण जर हे पुन्हा पुन्हा होत असेल तर हा शरीरात मॅग्नेशिअम कमी असल्याचा संकेत असू शकतो. मॅग्नेशिअमची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही नाचणीचा शीरा खाऊ शकता.
तिखट खाण्याची क्रेविंग
जर तुम्हाला अचानक काही तिखट खाण्याची इच्छा होत असेल तर ही काही सामान्य बाब नाही. तिखट खाण्याची इच्छा होण्यामागचं कारण झिंकची कमतरता असू शकतं. झिंक मिळवण्यासाठी एक ग्लास कोमट दुधात थोडी हळद, चिमुटभर जायफळ टाकून प्यावं.
खडू खाण्याची क्रेविंग
बऱ्याच लोकांना खडू किंवा लेखण खाण्याची सुद्धा इच्छा होत असते. तर यामागे शरीरात आयर्नची कमतरता हे कारण असू शकतं. आयर्न मिळवण्यासाठी पालक, बीट भरपूर खावेत.